गडकोट, किल्ले हा आपला ठेवा; तो जपण्याचे काम करू- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

किल्ले शिवनेरी येथे शिवजन्मोत्सव सोहळ्याचे आयोजन

किल्ले शिवनेरीवर आयोजित शिवजन्मोत्सव सोहळ्याप्रसंगी श्री. शिंदे बोलत होते. कार्यक्रमास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार, सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील, खासदार अमोल कोल्हे, आमदार अतुल बेनके, माजी खासदार तथा म्हाडाच्या पुणे गृहनिर्माण मंडळाचे अध्यक्ष शिवाजीराव आढळराव पाटील, माजी आमदार शरद सोनवणे, विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार, कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी, जिल्हा नियोजन समितीच्या सदस्य आशाताई बुचके, जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे, मुख्य वनसंरक्षक एन. आर. प्रवीण, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश चव्हाण, जिल्हा पोलीस अधीक्षक, पंकज देशमुख, उपवनसंरक्षक अमोल सातपुते, मराठा सेवा संघाचे प्रदेशाध्यक्ष विजय घोगरे आदी उपस्थित होते.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या दूरदृष्टीची कल्पना सामान्य माणूस करू शकत नाही, असे सांगून मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले, त्यांनी वास्तुकला, अभियांत्रिकी, किल्ल्यावरील प्रत्येक थेंब पाण्याचा उपयोग करून घेण्याची दूरदृष्टी त्या काळी दाखवली. पर्यटन विभागाने हिंदवी स्वराज्य महोत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतल्याबद्दल विभागाचे त्यांनी अभिनंदन केले.

ते पुढे म्हणाले, अखंड हिंदुस्थानचे अभिमान, दैवत आणि लोकशाहीचा कारभार साडेतीनशे वर्षांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कारकिर्दीत झाला. शिवछत्रपती म्हणजे पराक्रम, शौर्य, त्याग, समर्पण आणि दूरदृष्टी असलेले नेतृत्व होते. ते सर्वव्यापी होते आणि त्यांनी सर्वांना बरोबर घेऊन काम केले. ते युगपुरुष, युगप्रवर्तक आणि रयतेचे राजे होते. अठरापगड जातीचे, धर्माचे लोक त्यांनी एकत्र आणले. प्रजेच्या दुःखापुढे, कल्याणापुढे स्वतःचे दुःख, आराम कवडीमोल मानला. त्यांनी तलवार हाती घेतली पण निष्पापांच्या रक्ताने रंगू दिली नाही. त्यामुळे त्यांच्या तलवारीला रक्ताचा वास येत नाही तर मानवतेचा सुगंध येतो. ते केवळ व्यक्ती नाही तर विचार होते.

शिवरायांकडील एक तरी गुण आपण सर्वांनी घेतल्यास शिवजयंती साजरी करताना त्यांना हेच खरे अभिवादन ठरेल. त्यामुळे समाज, राज्य, देश आणि माणूस म्हणून आपण अधिक प्रगती करू, असेही ते म्हणाले.

मध्यंतरी देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देखील नौदलाच्या कार्यक्रमात त्यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण केले तसेच नौदलाच्या ध्वजावर शिवप्रतीमेला समाविष्ट केले ही आपल्या सर्वांसाठी अभिमानाची बाब आहे. कुपवाडा येथे भारत पाकिस्तान सीमेवर लष्करी जवानांनी शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा उभारण्यात आला. आग्र्याला देखील दिवाणे आम येथे शिवाजी महाराजांची जयंती गतवर्षीपासून साजरा करतो, असेही त्यांनी सांगितले.

छत्रपती शिवाजी महाराजांचे गडकोट किल्ले जागतिक वारसा स्थळामध्ये समाविष्ट करण्यासाठी प्रधानमंत्री यांनी शिफारस केली आहे. ही आपल्यासाठी अभिमानाची बाब आहे. जुन्नर हा पर्यटन तालुका असून बिबट सफारी विकसित करण्याचे घोषित केले आहे. येथील सुकाळवेढे, बोरघर, डूचकेवाडी, खेतेपठार मार्गे शिवजन्म भूमी आणि भीमाशंकर ही तीर्थक्षेत्रे जोडण्याचा प्रयत्न करू, असेही त्यांनी सांगितले.

मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी मंगळवारी विशेष अधिवेशन
मराठा समाजाला इतर कुणाचेही नुकसान न करता, कुठल्याही समाजाला धक्का न लावता टिकणारे, कायद्याच्या चौकटीत बसणारे आरक्षण देण्यासाठी विधानसभेचे विशेष अधिवेशन उद्या घेण्यात येणार आहे, असे मुख्यमंत्री महोदयांनी सांगितले. ३५० व्या शिवराज्याभिषेक वर्षानिमित्त राज्यभरात शिवाजी महाराजांच्या कार्यावर कार्यक्रम घेतले आहेत. जाणता राजाचे महानाट्याचे कार्यक्रम जिल्हावार घेत आहोत, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

किल्ल्यांच्या विकासाकरिता एएसआयचे नियम शिथिल करण्यासाठी केंद्र शासन सकारात्मक – देवेंद्र फडणवीस
राज्यातील किल्ल्याचे संवर्धन करीत असताना भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाकडून (एएसआय) येणाऱ्या अडचणीबाबत केंद्र शासन स्तरावर पाठपुरावा करून बैठक आयोजित करण्यात आली. त्यामध्ये पुरातत्व खात्याची प्रमाणित कार्यपद्धती सोपी करण्याबाबत आश्वासन देण्यात आले. पद्धत सोपी झाल्यानंतर किल्ले संवर्धन कामाला गती येईल. छत्रपती शिवाजी महाराज यांचे किल्ले म्हणून जागतिक वारसा स्थळामध्ये समावेश करण्यासाठी शिफारस करण्यात आली आहे, असे उपमख्यमंत्री श्री.फडणवीस म्हणाले.

किल्ल्याच्या संवर्धनासाठी निधी कमी पडून देणार नाही- उपमुख्यमंत्री अजित पवार
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्याचा इतिहास आदर्श सर्वांच्या डोळ्यासमोर राहावा यासाठी राज्यातील विविध किल्ले संवर्धनाचे काम राज्य शासनाने हाती घेतले आहे. किल्ले शिवनेरी यांच्या संवर्धनासाठी ८३ कोटी रुपये खर्च करण्यात आले आहे. किल्याच्या संवर्धनासाठी राज्य शासन निधी कमी पडून देणार नाही, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी दिली.

प्रारंभी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत शिवजन्मस्थानी पारंपरिक वेशातील महिलांनी शिवरायांची महती सांगणारा पाळणा गायिला. राष्ट्रगीत तसेच ‘गर्जा महाराष्ट्र माझा’ या राज्यगीताची धून पोलीस बँड पथकाने वाजवून सलामी दिली. त्यानंतर पोलीस पथकाने बंदुकीच्या तीन फैरी झाडून छत्रपती शिवरायांना मानवंदना दिली. यावेळी जिल्हा परिषद शाळा मुथळने येथील लहान विद्यार्थ्यांच्या बाल पथकाने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनातील प्रसंग सुंदर पद्धतीने सादर केले.

त्यानंतर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी बालशिवाजी व जिजाऊंच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेची पालखी वाहीली.

‘शिवाई देवराई’ आणि वन उद्यानाचे लोकार्पण
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत किल्ले शिवनेरी येथे ‘शिवाई देवराई’ आणि वन उद्यानाचे लोकार्पण करण्यात आले.

About The Author