जगातील सर्व शास्त्रे लोकसंख्येशी संबंधित- जे. ए. यादव
मिरज (प्रतिनिधी) ‘जगामध्ये पूर्वीपासूनच लोकसंख्या शास्त्राचा अभ्यास केला जातो. ऍरिस्टॉटल, कौटिल्य यांनीही आपल्या साहित्यातून लोकसंख्या शास्त्राचा उल्लेख केला आहे. पण आज जितक्या शास्त्रशुद्धपणे हा अभ्यास केला जातो तितका तो पूर्वी केला जात नव्हता. जगातील सर्व शास्त्रे प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरीत्या लोकसंख्येची संबंधित आहेत. आज भारताचे सरासरी वय ३१.५ वर्षे आहे आणि म्हणून भारत हा जगातील सर्वाधिक तरुणांचा देश आहे. त्याचा फायदा विकासासाठी करून घेणे गरजेचे आहे. असे केल्यास २०४७ पर्यंत भारत विकासाचे स्वप्न निश्चितच साध्य करू शकेल.’ असे उद्गार प्रा. जे. ऐ. यादव यांनी येथील शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे महाविद्यालय, मिरज येथे काढले.
अर्थशास्त्र विभाग आणि शिवाजी युनिव्हर्सिटी इकॉनॉमिक्स असोसिएशन, कोल्हापूर(सुएक) यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक लोकसंख्या दिनानिमित्त ‘लोकसंख्या आणि विकसित भारत @ २०४७’ या विषयावर आयोजित व्याख्यान प्रसंगी ते बोलत होते.
आपल्या मार्गदर्शनामध्ये प्रा. यादव पुढे म्हणाले की, स्त्री-पुरुष समानता हा लोकसंख्येतील महत्त्वाचा घटक विकासासाठी आवश्यक आहे, स्त्री-पुरुष समानतेसाठी शिक्षणातून येणारी प्रगल्भता महत्त्वाची ठरते. विकासाच्या गप्पा मारताना लोकसंख्येच्या संदर्भात देशात अपेक्षित बदल होणे गरजेचे आहे. भविष्यकालीन समस्या दूर करण्यासाठी लोकसंख्या शास्त्राचा अभ्यास उपयुक्त ठरतो. लोकसंख्याविषयक सिद्धांताचा आढावा घेताना जागतिक लोकसंख्येतील बदलाचा कल स्पष्ट केला. जगातील विविध देशांची लोकसंख्या आणि आर्थिक विकासाचा दर या संदर्भात भाष्य करताना त्यांनी लोकसंख्येची अनुमापी अनुकूलता याचेही विवेचन आपल्या मार्गदर्शनामध्ये केले.
अध्यक्षीय मनोगत मध्ये प्राचार्य डॉ. अनिल पाटील म्हणाले, वाढती लोकसंख्या अनेक समस्यांना निमंत्रण देते यातील प्रत्येक समस्येचा आपल्यावर प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष परिणाम होत असतो. विद्यार्थ्यांना उद्देशून ते म्हणाले की महाविद्यालयात आयोजित होणाऱ्या विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी स्वतःचा सर्वांगीण विकास करावा.
अर्थशास्त्र विभागाच्या वतीने ‘स्वातंत्र्योत्तर काळातील भारतीय लोकसंख्येतील बदल’ या विषयावर भित्तिपत्रिकेचे ही आयोजन करण्यात आले. बी.ए. भाग एक मधील विद्यार्थ्यांनी या निमित्ताने स्वातंत्र्योत्तर काळात भारतीय लोकसंख्या, साक्षरता प्रमाण, स्त्री-पुरुष प्रमाण, सरासरी आयुर्मान, लोकसंख्येचे ग्रामीण-शहरी वितरण, लोकसंख्येची व्यवसायानुसार तसेच वयोगटांनुसार विभागणी इत्यादी मध्ये झालेले बदल या विषयांवर भित्तिपत्रिका सादर केल्या.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक अर्थशास्त्र विभाग प्रमुख डॉ. वाय. डी. हरताळे यांनी केले, आभार डॉ. आर. के. गीत्ते यांनी व्यक्त केले. तर सूत्रसंचालन श्रीमती ए. के. सकटे यांनी केले. कार्यक्रमासाठी सुएक चे अध्यक्ष प्रा. एम. जी. पाटील, कन्या महाविद्यालय, मिरज चे प्राचार्य डॉ. यु. एम. माळकर, डॉ. मनोहर कोरे, अर्थशास्त्र विभागातील श्रीमती एस.पी. हाके, प्रा. संजय पाटील, महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.