मिरजेत मैत्री दिनानिमित्त वृक्ष संवर्धनाचा संदेश ; जिजाऊ चॅरिटेबल संस्थेचा स्तुत्य उपक्रम
मिरज (प्रतिनिधी)
मिरजेतील जिजाऊ चॅरिटेबल संस्थेतर्फे मैत्री दिनाच्या निमित्ताने वृक्षांसोबत मैत्री करून जीवनाचे आणि निसर्गाचे संवर्धन करण्याचा संदेश देण्यात आला. शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानातील वृक्षांना फ्रेंडशिप बँड बांधून वृक्ष संवर्धनाचा संकल्प करण्यात आला. यावेळी झाडे वाचवण्यासंदर्भातील घोषणाही देण्यात आल्या.
संस्थेचे अध्यक्ष धनंजय भिसे, काँग्रेसचे युवा नेते धनराज सातपुते, शिवसेनेचे शहर संघटक पप्पू शिंदे, पत्रकार जगदीश धुळूबुळू, ज्येष्ठ सामजिक कार्यकर्ते संजय मेथे, विनायक पवार, रणजीत काळे, मनोज कांबळे, प्रकाश सातपुते यांच्यासह जिजाऊ संस्थेचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.
यावेळी धनंजय भिसे म्हणाले की, वृक्षांचे आपल्या जीवनामध्ये महत्त्वाचे स्थान आहे. त्यामुळे आपण सर्वांनी वृक्षांची मैत्री करणे गरजेचे आहे. आज मैत्री दिनाचे औचित्य साधून समाजामध्ये वृक्ष, निसर्ग आणि जीवन संवर्धनाचा संदेश देण्यासाठी हा उपक्रम राबविल्याचे त्यांनी सांगितले.
काँग्रेसचे युवा नेते धनराज सातपुते म्हणाले की, वृक्ष हा निसर्गातील महत्त्वाचा घटक आहे. वृक्ष संवर्धन ही काळाची गरज आहे. जिजाऊ चॅरिटेबल संस्थेने मैत्री दिनाच्या निमित्ताने आयोजित केलेला हा उपक्रम खरोखरच समाजाला दिशादर्शक असल्याचे मत धनराज सातपुते यांनी व्यक्त केले. यावेळी झाडे वाचवा जीवन वाचवा; झाडे लावा झाडे जगवा, अशा घोषणा देण्यात आल्या.