सांगलीत दोन सराईत गुन्हेगारांना विश्रामबाग पोलिसांकडून अटक ; चार गुन्हे उघड व ५५ हजारांचा मुद्देमाल जप्त

सांगली प्रतिनिधी

सांगली आणि परिसरात विविध ठिकाणाहून दु्चाकी आणि बांधकामावरील साहित्य चोरणाऱ्या दोन सराईत गुन्हेगारांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून चार गुन्हे उघडकीस आणत दोन दुचाकी, दोन सळीं कटिंग मशिन, एक हँडग्राइंडर, असा ५५ हजारांचे साहित्य जप्त करण्यात आले आहे. विश्रामबाग पोलिसांनी ही कारवाई केली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुमित विनोद शिंदे (वय १९, रा. विद्याविहार कॉलनी), वृषभ सतीश हराळे (वय २२, रा. स्फूती चौक, विश्रमबाग, मूळ रा. येळावी, ता. तासगाव) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. शहरात विविध ठिकाणी दुचाकी चोरीच्या घटना घडत आहेत. यातील चोरट्यांचा विश्रामबागचे गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पथक शोध घेत होते. त्यावेळी वानलेसवाडी येथे विना क्रमांकाच्या दुचाकीवरून तिघेजण जात असल्याचे पथकारतील पोलीस अंमलदार संकेत कानडे, प्रशांत माळी यांना दिसले. त्यावेळी त्यांनी दुचाकीवरील तिघांना थांबवून त्यांच्याकडे चौकशी केली. त्यांच्याकडील दुचाकीच्या कागपत्रांबाबत चौकशी केल्यानंतर त्यांनी उडवाउडवीरची उत्तरे दिली. त्यांचा संशय आल्याने त्यांना ताब्यात घेऊन कसून चौकशी केल्यानंतर त्यांनी विजयनगर येथील दोन अपार्टमेंट परिसरातून दुचाकी चोरल्याची कबुली दिली.

तसेच आपटा पोलिस चौकी परिसरात बांधकाम सुरु असलेल्या ठिकाणाहून सळई कटिंग मशिन, हूँडग्राईंडर चोरल्याचीही कबूली दिली. त्यांच्याकडून चोरीचे साहित्य जप्त करण्यात आले आहे.त्यांच्याकडून विश्रामबाग पोलिस ठाण्याकडील तीन, संजयनगर पोलिस ठाण्याकडील एक असे चार गुन्हे उघडकीस आणण्यात आले आहेत.

About The Author