मनपाच्या करविभागातील दोघे लाचलुचपतच्या जाळ्यात ; उताऱ्यावर नावाची नोंद घालण्यास मागितली लाच
मिरज (प्रतिनिधी)
मालमत्ता असेसमेंट उताऱ्यावर नावाची नोंद करण्यासाठी एक हजार रुपये लाचेची मागणी करुन रक्कम स्विकारल्याप्रकरणी मनपाच्या करविभागातील दोघे कर्मचारी लाचलुचपतच्या जाळ्यात सापडले. याप्रकरणी कनिष्ठ लिपीक इम्रान अब्दुल रहमान देसाई (वय ३५, रा. उदगाव वेस, झेंडे महाराज मठाजवळ, मिरज) आणि शिपाई राजेश संजीवन मोरे (वय ५२, रा. मोरे बिल्डिंग, महादेव मंदिराच्या पाठीमागे, चंदनवाडी, मिरज ) या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घटनेची माहिती अशी, तक्रारदार यांनी काही मालमत्ता खरेदी केली होती. त्याची असेसमेंट उताऱ्यावरील त्यांच्या काकांचे नाव कमी करुन स्वत:च्या नावाची नोंद होवून घरपट्टीची आकारणी करण्यासाठी तक्रारदार यांनी महापालिकेच्या कर विभागातील कनिष्ठ लिपिक इम्रान देसाई यांच्याशी संपर्क साधला. त्यावेळी लिपिक देसाई यांच्यासह शिपाई राजेश मोरे यांनी तक्रारदाराकडे १ हजारची मागणी केली. याबाबत तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार अर्ज केला होता.
सदर तक्रारीची शहानिशा केली असता यामध्ये तथ्य असल्याचे निदर्शनास आले. लिपीक देसाई यांना लाच देण्यासाठी शिपाई राजेश मोरे यांनी प्रोत्साहित केल्याचे सिध्द झाले. यानंतर मंगळवार दि. ६ रोजी सायंकाळी ५ च्या सुमारास कुपवाड कार्यालयातील कर विभागात लाचलुचपत विभागाचे पोलीस निरिक्षक विनायक भिलारे यांच्या पथकाने सापळा लावला. यावेळी दोघा संशयितांनी तक्रारदार यांच्याकडे लाचेची मागणी करुन एक हजारची रक्कम स्विकारताना पथकातील अधिकाऱ्यांनी त्यांना रंगेहाथ ताब्यात घेतले. दोघांविरोधात कुपवाड पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियमाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.