पाटगाव व चिकोत्रा धरणातून विसर्ग वाढवला ; वेदगंगा नदी पात्राबाहेर
नदी काठावरील लोकांना सतर्कतेचा इशारा
गारगोटी (प्रतिनिधी) :- भुदरगड तालुक्यात गेल्या ५ दिवसापासून धुवांधार पाऊस सुरू असल्याने वेदगंगा नदी पात्राबाहेर पडली आहे. वेदगंगा नदीवरील तालुक्यातील चारही बंधारे पुन्हा पाण्याखाली गेली आहेत,तर पाटगाव धरणातून १९५१.६० क्यूसेक्स तर चिकोत्रा नदीत एकूण ८०० क्यूसेक्स पाण्याचा विसर्ग होत आहे,त्यामुळे नदी काठावरील लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
गेल्या आठ दिवसापासून भुदरगड तालुक्यात धुवांधार पाऊस सुरू आहे,गेल्या आठ तासात पाटगाव धरणक्षेत्रात ६० मिलिमीटर पाऊस झाला आहे. तर १ जूनपासून एकूण ७१४८ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. वेदगंगा नदीवरील पाटगाव (श्री मौनीसागर जलाशय) धरण पूर्ण क्षमतेने भरले असून सध्या या धरणातून सांडव्यावरून १६५१.६० क्यूसेक्स व विद्युत गृहातून ३०० क्यूसेक्स असा एकूण १९५१.६० क्यूसेक्स पाण्याचा विसर्ग वेदगंगा नदीत होत आहे, त्यामुळे वेदगंगा नदीच्या पाण्याची पातळी वाढली आहे, पाणी पात्राबाहेर पडले असून तालुक्यातील निळपण,वाघापूर,म्हसवे, शेणगाव ही बंधारे पाण्याखाली गेली आहेत.
चिकोत्रा धरण क्षेत्रात सुद्धा मुसळधार पाऊस सुरू आहे, चिकोत्रा धरण गेल्या महिन्यात १०० टक्के भरले आहे,सध्या होत असलेल्या पावसामुळे धरणाची पाणी पातळी सतत वाढत असून धरणाच्या सांडव्यावरून पाण्याचा विसर्ग ४०० क्यूसेक्स व धरणाच्या विद्युत गृहातून १०० क्युसेक्स इतका असा एकूण ५०० क्यूसेक्स एवढा विसर्ग चिकोत्रा नदीपात्रात सोडण्यात आला आहे. तसेच नागणवाडी ल. पा. प्रकल्प १०० टक्के भरून सांडव्यावरून ३०० क्यूसेक्स विसर्ग चालू आहे. त्यामुळे चिकोत्रा नदीपात्रात एकूण ८०० क्यूसेक्स इतका विसर्ग होऊन नदी पाणी पातळी वाढणार असलेने नदीकाठच्या लोकांनी सतर्क राहण्याचा इशारा वेदगंगा चिकोत्रा पाटबंधारे उपविभाग गारगोटीचे सहाय्यक अभियंता (श्रेणी १)महेश चव्हाण यांनी दिला आहे.