अधिकार मिळविताना कर्तव्यतत्पर राहिल्यास निकोप समाजनिर्मितीस हातभार – न्या. रंजना कांबळे
कन्या महाविद्यालयात कायदेविषयक जनजागृती शिबिरप्रसंगी केले प्रतिपादन
मिरज (प्रतिनिधी)
विद्यार्थ्यांनी समाज जीवनात आपले अधिकार मिळविताना कर्तव्याची पूर्तता करावी म्हणजे निकोप समाजाची निर्मिती होईल असे प्रतिपादन मिरज येथील सह दिवाणी न्यायाधीश न्यायाधीश सौ.रंजना कांबळे यांनी केले. जागतिक बालिका दिवसानिमित्त कन्या महाविद्यालय मिरज, विधी सेवा समिती, ॲडव्होकेट बार असोसिएशन मिरज यांचे संयुक्त विद्यमाने संपन्न झालेल्या कायदेविषयक जनजागृती शिबिरात त्या बोलत होत्या.
त्या पुढे म्हणाल्या की, मुलींनी समाज जीवनात शिक्षणाच्या मदतीने आर्थिक स्वावलंबन प्राप्त केल्याशिवाय त्यांना स्वाभिमानाने जगता येणार नाही .स्वतःचे जगणे समृद्ध करताना समाजाचे जीवन समृद्ध करण्यासाठी प्रत्येकाने आपले कर्तव्य निभावले पाहिजे. तसेच आधुनिक जीवनातील प्रलोभने दूर सारून आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित केले पाहिजे.
बार असोसिएशन मिरजचे अध्यक्ष ॲड. मोहन खोत यांनी आपल्या मनोगतामध्ये कायदा क्षेत्रातील आपले अनेक अनुभव कथन केले व जबाबदार नागरिकांची कर्तव्य स्पष्ट केली. सांगली जिल्हा सायबर सुरक्षा विभागाचे प्रमुख पोलीस उपनिरीक्षक अफरोज पठाण व करण परदेशी यांनी मुलींना सायबर सुरक्षा या विषयावर माहिती देताना मोबाईल फोन आणि समाज माध्यमे वापरण्यातील धोक्यांची जाणीव करून दिली. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. उल्हास माळकर यांनी देशातील न्यायव्यवस्था ही लोकशाही जिवंत ठेवण्यात महत्त्वाची कामगिरी करत असल्याचे सविस्तर स्पष्ट केले. प्रारंभी महाविद्यालयातील डॉ.मंजिरी कुलकर्णी यांनी स्वागत व प्रास्ताविकात कार्यक्रमाचा हेतू विशद केला. पाहुण्यांचा परिचय प्रा. मानसी शिरगावकर यांनी करून दिला. सूत्रसंचालन प्रा. नलिनी सूर्यवंशी यांनी केले. आभार प्रदर्शन डॉ. शबाना हळंगळी यांनी केले. याप्रसंगी उपप्राचार्या प्रा. डॉ. सुनिता माळी, पर्यवेक्षिका प्रा. नलिनी प्रज्ञासूर्य, ॲड. रवी लोणकर, समन्वयक शितल पाटील, डॉ.चंदनशिवे, डॉ.गंगाधर चव्हाण तसेच शिक्षक आणि विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.