आनंदी लैंगिक जीवनासाठी मानसिक व शारीरिक स्वास्थ्य महत्त्वाचे : डॉ. प्रकाश कोठारी

0
WhatsApp Image 2025-12-13 at 6.21.30 PM

कोल्हापूर (प्रतिनिधी)
आनंदी आणि समाधानकारक लैंगिक जीवनासाठी मानसिक तसेच शारीरिक स्वास्थ्य तितकेच महत्त्वाचे असल्याचे प्रतिपादन नामांकित सेक्सोलॉजिस्ट डॉ. प्रकाश कोठारी यांनी केले. कोल्हापूर स्त्री रोग व प्रसूती तज्ञ संघटना आणि असोसिएशन ऑफ महाराष्ट्र ऑब्स्टेट्रिक अँड गायनॅकॉलॉजिकल सोसायटी (AMOGS) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित लैंगिकता शास्त्रावरील दोन दिवसीय राज्यस्तरीय वैद्यकीय परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.

परिषदेच्या अध्यक्षस्थानी डॉ. एम. जे. नागावकर होते. त्यांनी परिषदेचा उद्देश विशद करताना सांगितले की, डॉक्टरांना वैद्यकशास्त्रातील नवीन उपचार पद्धती, आधुनिक तंत्रज्ञान आणि संशोधनाची माहिती मिळावी तसेच ज्ञानाची देवाणघेवाण व्हावी, यासाठी अशा प्रकारच्या परिषदांचे आयोजन केले जाते. कोल्हापूरमध्ये लैंगिकता शास्त्रावर प्रथमच अशी परिषद आयोजित करण्यात आल्याचे त्यांनी नमूद केले.

उद्घाटन समारंभास महाराष्ट्र राज्य संघटनेचे अध्यक्ष डॉ. किरण कुर्तकोटी, डॉ. राजशेखर ब्रह्मभट्ट, डॉ. टी. एस. सत्यनारायण राव तसेच कोल्हापूर मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. आर. एम. कुलकर्णी यांची प्रमुख उपस्थिती होती.

या वेळी महाराष्ट्र राज्य संघटनेतर्फे जाहीर करण्यात आलेला यंदाचा जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ व नामांकित डॉक्टर डॉ. ज. ल. नागावकर आणि डॉ. शशिकांत कुलकर्णी यांना त्यांच्या समाजकार्यासाठीच्या निस्वार्थ व उल्लेखनीय योगदानाबद्दल प्रदान करण्यात आला.

या परिषदेसाठी कोल्हापूर मेडिकल असोसिएशन, कोल्हापूर सायकियाट्री सोसायटी आणि कोल्हापूर युरॉलॉजिकल सोसायटी यांचे सहकार्य लाभले आहे.

उद्घाटनप्रसंगी डॉ. एम. जे. नागावकर, संघटनेचे सचिव डॉ. रणजीत किल्लेदार, कोल्हापूर मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. आर. एम. कुलकर्णी, डॉ. प्रशांत शहा, डॉ. प्रसाद हलकर्णीकर, डॉ. इंद्रनील जाधव, डॉ. गौरी सईप्रसाद, डॉ. रूपा नागावकर, डॉ. दादासाहेब पाटील, डॉ. अस्मिता भागवत, डॉ. किशोर केसरकर व डॉ. गौरी केणी उपस्थित होते.

दिवसभर चाललेल्या या परिषदेत विविध तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले. ‘लैंगिक शरीरक्रियाविज्ञान आणि स्त्रीरोगशास्त्र’ या चर्चासत्रात डॉ. पद्मिनी प्रसाद यांनी लैंगिक प्रतिसाद चक्राच्या शरीरविज्ञानावर प्रकाश टाकला. डॉ. दीपक जुमानी यांनी लैंगिक समस्यांमधील शीघ्रपतन या विषयावर मार्गदर्शन केले. ‘लैंगिक आव्हानांचा सामना आणि प्रगतिशील दृष्टिकोन’ या विषयावर डॉ. प्रकाश कोठारी यांनी विचार मांडले. लैंगिक व्यायामासाठीच्या उपचार पद्धतींबाबत डॉ. राजशेखर ब्रह्मभट्ट यांनी भाष्य केले, तर मानसोपचार तज्ज्ञ डॉ. टी. एस. सत्यनारायण राव यांनी लैंगिकतेचा समतोल व मानसिक आरोग्य याविषयी सविस्तर माहिती दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *