एनसीसी कॅडेट्सकडून कॅप्टन शंकर सखाराम वाळकर यांना भावपूर्ण अभिवादन
६ महाराष्ट्र गर्ल्स एनसीसी बटालियनतर्फे स्मारकाची स्वच्छता
कोल्हापूर. (प्रतिनिधी) १९७१ साली पाकिस्तानविरुद्ध झालेल्या युद्धात १७ डिसेंबर रोजी वीरमरण पत्करलेले महावीर चक्र सन्मानित कॅप्टन शंकर सखाराम वाळकर (१८ मद्रास रेजिमेंट) यांच्या स्मृतिदिनानिमित्त हुतात्मा पार्क, कोल्हापूर येथे अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
हा कार्यक्रम ६ महाराष्ट्र गर्ल्स एनसीसी बटालियन, कोल्हापूरचे कमांडिंग ऑफिसर कर्नल विक्रम नलावडे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला. या उपक्रमात बटालियनमधील सुमारे ४०० एनसीसी कॅडेट्स मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी कॅप्टन शंकर सखाराम वाळकर यांच्या स्मारकास पुष्पचक्र अर्पण करून कॅडेट्सकडून भावपूर्ण अभिवादन करण्यात आले. यानंतर कॅडेट्सनी स्वच्छता मोहिम राबवत हुतात्मा पार्क परिसराची स्वच्छता केली.
या प्रसंगी कोल्हापूरमधील निवृत्त लष्करी अधिकारी तसेच मद्रास रेजिमेंटचे माजी सैनिक (व्हेटरन्स) विशेष उपस्थित होते. तसेच १८ मद्रास रेजिमेंटचे सेवारत व निवृत्त सैनिक यांनीही कार्यक्रमाला उपस्थित राहून कॅडेट्सना संबोधित केले. त्यांनी कॅप्टन वाळकर यांचे शौर्य, देशासाठी केलेले सर्वोच्च बलिदान, राष्ट्रसेवा व देशभक्तीचे महत्त्व याबाबत मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमास ६ महाराष्ट्र गर्ल्स एनसीसी बटालियनचे सुभेदार मेजर, माजी सैनिक, एनसीसी अधिकारी, कायमस्वरूपी कर्मचारी तसेच अन्य मान्यवर उपस्थित होते. या उपक्रमातून कॅडेट्समध्ये देशभक्ती, सामाजिक जबाबदारी आणि राष्ट्रप्रेमाची भावना अधिक दृढ झाल्याचे दिसून आले.



