योग्य वेळ, योग्य रस्ता, योग्य मार्गदर्शन आणि कष्ट यातून स्वप्न साकार होईल – मोसमी चौगुले

0
स्पर्धा परीक्षेच्या यशाची चतुसूत्री मोसमी चौगुले

उपविभागीय दंडाधिकारी मोसमी चौगुले यांनी सांगितली स्पर्धा परीक्षेच्या यशाची चतु:सूत्री   

कोल्हापूर (प्रतिनिधी) कोणत्याही स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करीत असताना आपणास ज्या विषयामध्ये रुची आहे. असे विषय निवडा आणि अभ्यासाला प्रारंभ करा. त्याचा सर्वोत्तम सराव करा. तो सराव तुम्हाला यशाकडे घेवून जाणार असतो. योग्य वेळ, योग्य रस्ता, योग्य मार्गदर्शन आणि तुम्ही त्यासाठी घेत असलेले कष्ट यातून तुमचे स्पर्धा परीक्षेचे स्वप्न साकार होईल. हे असे मत करवीरच्या उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी मा. श्रीमती मोसमी चौगुले यांनी व्यक्त केले.  

        रयत शिक्षण संस्थेच्या राजर्षी छ. शाहू कॉलेज कदमवाडी रोड कोल्हापूर येथे रयत स्पर्धा परीक्षा अॅकॅडमीच्या उद्घाटनप्रसंगी आयोजित केलेल्या ‘स्पर्धा परीक्षा आणि आजचे तरुण – तरुणी’ ह्या विशेष व्याख्यानात श्रीमती मोसमी चौगुले बोलत होत्या. त्यांनी आपल्या मार्गदर्शनामध्ये आज स्पर्धा परीक्षेची सद्यस्थिती, परीक्षांची तयारी करणाऱ्या तरुणाईची मानसिकता आणि अभ्यास ह्या विषयांच्या अनुषंगाने मार्गदर्शन केले. ह्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य, प्रो. डॉ. डी. आर. भोसले हे होते. 

      अनेकदा स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करीत असताना अपयश येत असते. अपयशाने खचू नका. त्यासाठी एखाद्या छंदाशी मैत्री करा. `केंद्रीय लोकसेवा आयोग व महाराष्ट्र लोकसेवा आयोग यांच्या परीक्षेची तयारी करण्यासाठी महाविद्यालयात तज्ज्ञ मार्गदर्शक, प्रशस्त वर्ग व सुसज्ज ग्रंथालय उपलब्ध आहे. तरी कोल्हापूर व कोल्हापूर परिसरातील स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या युवक युवतींनी याचा लाभ घ्यावा. असे आवाहन कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रो. भोसले यांनी केले.  

  कार्यक्रमाच्या प्रारंभी मा. चौगुले मॅडम यांच्या शुभहस्ते महाविद्यालयाच्या आवारातील प्रा. डॉ. एन. डी. पाटीलसाहेब यांच्या माहिती फलकाचे, स्पर्धा परीक्षा अभ्यास कक्षाचे व स्पर्धा परीक्षा ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी आयक्युएससी प्रमुख डॉ. यु. बी. शेळके, उपप्राचार्या,प्रो. डॉ. पी. बी. पिस्टे, प्रो. डॉ. एम. बी. देसाई, डॉ. ए. पी. उबाळे, ज्युनिअर विभागाच्या उपप्राचार्या, प्रा. एल. बी. चव्हाण, सर्व विभागाचे विभागप्रमुख, प्राध्यापक व स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व प्रमुख पाहुण्याचे स्वागत डॉ. एस. पी. खोले यांनी केले. तर सूत्रसंचालन प्रा. जे. ए. कांबळे यांनी व आभारप्रदर्शन डॉ. बी. बी. घुरके यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *