गोव्यातील जगप्रसिद्ध बिग फूट संग्रहालयात अनिल दबडे यांचे पेंटिंग

मिरज (प्रतिनिधी)
गोवा येथील जगप्रसिद्ध बिग फूट म्युझियम आणि संग्रहालयामध्ये मिरज येथील प्रसिद्ध चित्रकार डॉ. अनिल दबडे यांचे पेंटिंग (कॅरीकेचर) कायमस्वरूपी लावण्यात आले आहे. बिग फूट हे म्युझियम मडगाव गोवा जवळ लोटोलिम येथे आहे. गेली ४० वर्ष हे संग्रहालय पर्यटकांचे आवडते केंद्र बनलेले आहे.
११ एकरामध्ये हे म्युझियम पसरले असून त्यामध्ये जुन्या गोव्यातील पारंपारिक व्यवसायाचे शिल्पकाम ही पाहायला मिळते. विशेष महत्त्वाचे म्हणजे बिग फूट म्युझियमचे सर्वेसर्वा ज्यूसलीन अलवारिस यांनी पूर्ण आयुष्य या म्युझियमसाठी वाहिले आहे. त्यांच्या प्रयत्नातून हे संग्रहालय जगप्रसिद्ध झाले आहे. हे म्युझियम ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी परशुराम यांची पावलेही या प्रदर्शनात पाहायला मिळतात.
अलवारिस यांनी संत मीराबाईंचे शिल्प पंधरा दिवसात रात्रंदिवस केवळ हातोडी आणि छन्नीच्या साह्याने शिल्प तयार केले आहे. याची नोंद लिम्का आणि इंडिया रेकॉर्डने घेतली आहे. गोव्यावर राज्य करणाऱ्या पोर्तुगीजांपासून गोव्याचे पारंपारिक व्यवसाय रीती रिवाज या प्रदर्शनामध्ये दाखवलेले आहे. चित्रकार अनिल दबडे यांचा २५ देशांचा प्रवास झाला असून बेल्जियम, दक्षिण आफ्रिका, सीसल्स येथील शासनाच्या लायब्ररीमध्ये दबडे यांची व्यंगचित्राची पुस्तके पाहायला मिळतात. शरद पवार, अशोक सराफ, दिलीप कुमार असे मोठमोठे नेते तसेच सीशेल देशाचे पंतप्रधान, भारतातील इतर राज्यातील नेतेमंडळी, देश प्रदेशातील विविध ठिकाणी दबडे यांची पेंटिंग्स आहेत. जगप्रसिद्ध बिग फूट प्रदर्शनामध्ये दबडे यांच्या चित्राला मानाचे स्थान मिळालेले आहे. त्याबद्दल सर्वत्र त्यांचे कौतुक होत आहे.