महत्त्वपूर्ण खेळाडूंच्या दुखापतीमुळे दुसऱ्या कसोटीपूर्वी भारतासमोर पेच
पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्यातील पराभवानंतर भारतीय संघात बदल केले गेले असले, तरी रवींद्र जडेजा आणि के.एल. राहुल यांच्या दुखापतीमुळे संघ व्यवस्थापनासमोर दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी संघ निवडीची डोकेदुखी वाढली आहे.
हैदराबाद कसोटी सामन्यात पहिल्या डावात राहुल आणि जडेजाचे योगदान महत्त्वाचे होते. पण, दुसऱ्या डावात भारताची सगळीच गणिते चुकली. प्रमुख अस्त्र असलेली फिरकी गोलंदाजी चालली नाही आणि आघाडीच्या फलंदाजांनीही आपल्या गुणवत्तेला न्याय दिला नाही. अशातच एकेरी धाव पळताना जडेजाचे स्नायू दुखावले, तर राहुलची मांडी दुखावल्यामळे दोघेही दुसऱ्या कसोटी सामन्यातून बाहेर पडले.
इंग्लंडच्या ‘बॅझबॉल’ नियोजनासमोर आधीच गडबडून गेलेल्या भारतीय संघ व्यवस्थापनासमोर या दोघांच्या अनुपलब्धतेमुळे चिंतेची भर पडली आहे. जडेजाची अष्टपैलू उपयुक्तता आणि राहुलची भरवशाची फलंदाजी अशा दोन्ही आघाडयांवर भारताला आता नवा शोध घ्यावा लागणार आहे. विराट कोहलीने यापूर्वीच दोन कसोटी सामन्यांतून माघार घेतली आहे. या सगळया रिकाम्या जागा भरण्यासाठी निवड समितीने कर्णधार रोहित शर्मा आणि प्रशिक्षक राहुल द्रविड यांच्या समोर सर्फराज खान, सौरभ कुमार, वॉशिंग्टन सुंदर असे पर्याय उपलब्ध करून दिले आहेत. सर्फराजचा भारतीय संघात शिरकाव झाला असला, तरी सध्याच्या स्थितीत राहुलची जागा घेण्यासाठी रजत पाटीदारचे पारडे जड आहे. पाटीदारला विराटच्या माघारीनंतर पहिल्या कसोटी सामन्यादरम्यानच संघात स्थान देण्यात आले होते. त्याचवेळी फिरकीसाठी जडेजाची जागा कुलदीप घेऊ शकतो. त्यामुळे अश्विन, अक्षर पटेलबरोबर तिसऱ्या फिरकी गोलंदाजीचा प्रश्न सोडवला जाऊ शकतो. एकूणच नव्या खेळाडूंचा संघात समावेश करण्यात आला असला, तरी अंतिम अकरामध्ये यापूर्वी संघात स्थान मिळालेल्या खेळाडूंना प्राधान्य मिळू शकते.