‘जनसुराज्य’ महायुतीतला एक प्रमुख घटक पक्ष त्यामुळे मिरज विधानसभेसाठीची मागणी रास्त – खा.गोपछडे

वीरशैव लिंगायत सन्मान यात्रेच्या निमित्ताने राज्यसभा खासदार अजित गोपछडे मिरजेत

मिरज (प्रतिनिधी)
जनसुराज्य शक्ती पक्ष हा महायुतीतला एक प्रमुख घटक पक्ष आहे. त्यामुळे मिरज विधानसभा मतदारसंघाची त्यांनी केलेली मागणी रास्त आहे. जनसुराज्य पक्षाच्या माध्यमातून लिंगायत समाजाचे मोठे नेतृत्व केले आहे. सहकारी संस्थांचे जाळे विणले आहे. त्यांना प्रतिनिधित्व देण्याबाबत महायुतीतला घटक पक्ष म्हणून त्यांनी मागणी करणे उचित आहे. त्यांच्या मागणीचे मी समर्थन करतो, असे प्रतिपादन भाजपचे राज्यसभा खासदार अजित गोपच्छडे यांनी केले. वीरशैव लिंगायत सन्मान यात्रेच्या निमित्ताने मिरजेत आले असता पत्रकार परिषदेवेळी त्यांनी याबाबतचे प्रतिपादन केले.

यावेळी जत येथील भाजपचे ज्येष्ठ नेते डॉ. रवींद्र आरळी, भाजप वैद्यकीय सेलचे नितेश पवार यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. खासदार अजित गोपच्छडे म्हणाले की, राज्यात वीरशैव लिंगायत सन्मान यात्रा सुरू करण्यात आली आहे. सोलापूर येथून आम्ही जत व मिरज येथे यात्रा आलो आहोत. दिनांक २१ सप्टेंबर रोजी मंगळवेढा येथे लाखो लिंगायत समाज बांधवांच्या उपस्थितीत यात्रेचा समारोप होणार आहे. राज्यभरात विखुरलेल्या लिंगायत समाजाला एकत्र करणे. समाजाचा सन्मान वाढविणे. समाजातील गरीब शेतकऱ्यांच्या मुलामुलींच्या शिक्षणाची सोय करणे. लिंगायत समाजाची सामाजिक, आर्थिक, सहकार, कृषी, अशा सर्व क्षेत्रांमध्ये प्रगती करणे. राजकीय क्षेत्रातील सर्व मंडळींना एकत्र आणून एकोप्याने राजकीय नेतृत्व विकसित करणे, या दृष्टिकोनातून ही यात्रा निघाली असल्याचे त्यांनी सांगितले.

राज्यभरात ज्या ज्या विधानसभा मतदारसंघात लिंगायत समाजाचे कार्यकर्ते चांगले काम करत आहेत. केवळ लिंगायत बहुल मतदारसंघातच नव्हे तर अन्यही मतदारसंघांमध्ये जेथे लिंगायत समाजाचे कार्यकर्ते सर्वसमावेशक भूमिका घेऊन काम करत आहेत, त्यातून नेतृत्व उभे राहिले असेल तर त्याचाही विचार झाला पाहिजे. अशा ठिकाणी लिंगायत समाजाला उमेदवारी दिली पाहिजे. राज्यात ५७ ते ५८ विधानसभा मतदारसंघांमध्ये लिंगायत समाज मोठ्या प्रमाणात आहे. १९८२ मध्ये राज्यात लिंगायत समाजाचे २२ आमदार होते. सध्या केवळ ४ ते ५ आमदार आहेत. त्यामुळे लिंगायत समाजातून जास्त आमदार निवडून जावेत असे प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले.

About The Author