मालकाच्या निधनानंतर अन्नत्याग केलेल्या इमानी श्वानानेही सोडला अखेर प्राण

बिद्री (सुनील माजगावकर)- सुप्रसिद्ध दिवंगत अभिनेते शाहीर दादा कोंडके यांच्या एकटा जीव सदाशिव या चित्रपटातील ‘ माणसा परीस मेंढरं बरी… ‘ या गाण्याची प्रचिती ‘सोन्या ‘ नावाच्या एका श्वानाने त्याच्या मालकाप्रती मृत्यूनंतर दाखवलिलेल्या स्वामीनिष्ठेने आणून दिली आहे. बिद्री साखर कारखान्याचे उपाध्यक्ष स्वर्गीय गणपतराव फराकटे यांनी माणसांसोबतच मुक्या प्राण्यांनाही जीव लावला होता. त्यांच्या निधनानंतर अन्नपाणी सोडलेल्या लाडक्या सोन्यानेही अखेर आज आपला देह ठेवला आणि तोही मालकापाठोपाठ कायमचा निघून गेला. सोन्याच्या या स्वामीनिष्ठेने फराकटे कुटुंबियांसह परिसरही गलबलून गेला.

    कागल तालुक्यातील बोरवडे गावचे माजी सरपंच, कागल पंचायत समितीचे माजी उपसभापती व बिद्री साखर कारखान्याचे विद्यमान उपाध्यक्ष गणपतराव फराकटे ( तात्या ) यांचे २४ ऑगस्ट रोजी आकस्मिक निधन झाले. त्यांचे श्वानप्रेम गावात सर्वांनाच माहीत होते. सुमारे चौदा वर्षांपूर्वी फराकटे यांच्या शेतात धनगरांचा तळ बसला होता. यातील पांढऱ्या शुभ्र रंगाच्या कुत्र्याच्या पिल्लाला तात्यांनी घरी आणले. त्याचे लाडाने सोन्या असे नामकरण केले. मागील चौदा वर्षांत सोन्याने आपल्या मालकाची नेहमीच साथसोबत केली.

      सकाळी लवकरच सोन्या तात्यांच्या दारासमोर त्यांची वाट पाहत बसायचा. तात्या बाहेर पडले की सोन्या त्यांच्यासोबतच विठ्ठल दूध संस्थेत जायचा. या ठिकाणी त्याचा दररोजचा बिस्कीट पुडा ठरलेला असायचा. नंतर तात्यांच्या सोबतच सोन्या घरी यायचा. ते बाहेरगावी गेल्यानंतर सोन्या घरच्या महिलांसोबत शेताकडे जायचा. घरी आल्यावर तो सायंकाळी पुन्हा दारात बसून मालकाची वाट पाहत बसलेला असायचा. तात्याही लाडक्या सोन्याला भाकरी घातल्याशिवाय आपण कधीच जेवायचे नाहीत.   परंतू २४ ऑगस्ट रोजी तात्यांचे आकस्मिक निधन झाल्याने सर्वांनाच अतोनात दुःख झाले. तसेच ते त्यांच्या सोन्यालाही झाले. माणसाप्रमाणेच तोही अश्रू ढाळत मुक्या मनाने आपल्या मालकाला श्रद्धांजली वाहत होता. त्या दिवसापासून सोन्याने अन्न पाणी वर्ज्य केले होते. काहींनी त्याला बळेच खाऊ घालण्याचा प्रयत्न केला. परंतु सोन्याने त्याला प्रतिसाद दिला नाही. आज अखेर २४ दिवसांनी सोन्याचे निधन झाले. त्याच्यावर विधिवत अंत्यविधी करत फराकटे कुटुंबियांनीही सोन्याप्रती आत्मीयता जपली.

अंत्यविधीच्या ठिकाणीच दोन दिवस बसून होता ‘ सोन्या ‘.

स्व. फराकटे तात्यांचा सोन्या या श्वानावर फार जीव होता. तोही आपल्या मालकासोबत सावलीसारखा राहत होता. परंतू २४ ऑगस्ट रोजी या दोघांची कायमची ताटातूट झाली. तात्यांच्यावर अंत्यविधी केल्यानंतर सर्वजण घरी परतले. परंतू सोन्या मात्र त्याच ठिकाणी बसून होता. दोन दिवसानंतर रक्षाविसर्जन झाल्यावरही सोन्या त्याच ठिकाणी होता. कुटूंबियांनी शेवटी त्याला घरी आणले. मात्र मालकाच्या वियोगाने त्याने अन्नाला स्पर्श केला नाही. अखेर त्याचा आज दुर्देवी मृत्यू झाला.