बदलापूर आणि कोलकत्ता लैंगिक अत्याचाराच्या घटनांची पुनरावृत्ती नको- पृथ्वीराज पाटील

लाडक्या बहिणींच्या मुलींवर अत्याचार करणाऱ्या क्रूरकर्मा आरोपींना कठोर शिक्षा करण्याची मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांकडे मागणी

सांगली (प्रतिनिधी)

बदलापूरमध्ये दोन चिमुरडींवर झालेले लैंगिक अत्याचार आणि कोलकात्याच्या हाॅस्पिटलमधील डाॅक्टरवर झालेला बलात्कार आणि हत्या या घटना माणुसकीला काळिमा फासणाऱ्या, क्रूर व घृणास्पद आहेत. आम्ही या घटनांचा तीव्र निषेध करतो.या दोन्ही घटनांमधील क्रूर आरोपीवर जलदगती न्यायालयात खटला चालवून आरोपींना कठोरात कठोर शिक्षा देण्यात यावी. राज्यातील सर्व शाळा व महाविद्यालयातील मुली आणि खासगी, शासकीय व निमशासकीय दवाखान्यात डाॅक्टर्स व वैद्यकीय कर्मचाऱ्यांची सुरक्षितता निश्चित करणारा कायदा तातडीने करावा अशी जोरदार मागणी सांगली शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी राज्याचे मुख्यमंत्री ना. एकनाथजी शिंदे व उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार व ना. देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

निवेदनात पृथ्वीराज म्हणतात, बदलापूर आणि कोलकत्ता येथील घटना अत्यंत घृणास्पद व समाजविघातक आहेत.राज्यातील कायदा व सुव्यवस्था परिस्थिती गंभीर बनत चालली आहे. विद्यार्थ्यींनीं, महिला, लाडक्या बहिणी आणि त्यांच्या छोट्या छोट्या मुलीही सुरक्षित नाहीत. ‘जनतेच्या जिवीताचे रक्षण करणाऱ्या डॉक्टरांचे जिवीतही सुरक्षित नाही.गुन्हेगार निर्ढावलेले आहेत. त्यांच्यावर कायद्याचा धाक उरला नाही. विद्यार्थ्यींनींना निर्भयतेने शिकता यावे यासाठी शाळा/महाविद्यालयात आणि दवाखान्यात डॉक्टर्स व कर्मचाऱ्यांना निर्भयतेने रुग्णसेवा करता यावी यासाठी दवाखान्यात सीसीटीव्ही कॅमेरे सक्तीचे करुन त्याचा नियमित आढावा घेतला जावा.. महिला पोलिसांसह पोलीस बंदोबस्त ठेवावा. हल्ले झाले तर तात्काळ आरोपीला अटक करुन कडक कारवाई करावी.

बदलापूर घटनेमुळे जनतेत प्रचंड संताप व्यक्त होऊन लोक रस्त्यावर उतरून आंदोलन करीत आहेत. या प्रकरणी कोणालाही पाठीशी न घालता जलद गती न्यायालयात खटला चालवून आरोपींना कठोर शिक्षा व्हावी. कर्तव्यात कसूर केलेल्या पोलीस निरीक्षक, उपनिरीक्षक व हेड कॉन्स्टेबल यांना तात्काळ सेवेतून बडतर्फ करावे. अशीही मागणी पृथ्वीराज यांनी निवेदनात केली आहे.

About The Author