बिद्रीचा जुना पूल पाण्याखाली
शेकडो एकरातील पिकांना जलसमाधी
बिद्री (प्रतिनिधी) :- गेले आठवडाभर पडलेल्या मुसळधार पावसाने दूधगंगा नदीच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ झाली आहे. काळम्मावाडी धरणातून सध्या ८१०० क्युसेक्स पाण्याचा विसर्ग दूधगंगा नदीपात्रात होत आहे. त्यामुळे कोल्हापूर-गारगोटी राज्य मार्गावरील बिद्री येथील दुधगंगा नदीवरील जुना पूल पाण्याखाली गेला आहे. सध्या नव्या पुलावरुन वाहतूक सुरु असून नदीचे पाणी पात्राबाहेर गेल्याने शेकडो एकरातील पिकांना जलसमाधी मिळाली आहे.
धरण क्षेत्रात पावसाचा जोर कायम राहिल्याने बहुतांश सर्वच नद्यांच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ झाली आहे. दुधगंगा नदीचे पाणी यंदा पहिल्यांदाच पात्राबाहेर गेले आहे. सततच्या जोरदार पावसाने नदी, ओढे, नाले तुडूंब भरले असून शेतशिवारात पाणीच पाणी झाले आहे. नदीलगतच्या शेकडो एकरातील ऊस व भात पिके पाण्याखाली गेली आहेत. यामुळे ही पिके कुजण्याचा धोका निर्माण झाला आहे.
पावसाचा जोर चार दिवसांपासून वाढल्याने दूधगंगा नदीचे पाणी आजूबाजूच्या शिवारात शिरले आहे. या पाण्यामुळे कोल्हापूर-गारगोटी राज्य मार्गावरील बिद्री येथील दुधगंगा नदीवरील जुना पूल पाण्याखाली गेला आहे. आज सकाळपासून पावसाचा जोर कमी झाला असला तरी धरणातून सोडलेल्या पाण्यामुळे पाण्याचा फुगवटा वाढत आहे. दरम्यान पूर पाहण्यासाठी परिसरातील नागरिकांनी नव्या पुलावर गर्दी केली आहे. तर काही हौशी मंडळी मासेमारी करण्यासाठी नदीकाठावर हजेरी लावत आहेत.