छत्रपती शिवरायांचा पुतळा कोसळल्याची घटना निषेधार्थ – महादेव दबडे
याप्रकरणी दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करीत तहसीलदारांना दिले निवेदन
मिरज (प्रतिनिधी)
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण येथील राजकोट किल्ल्यावर घडलेल्या दुर्घटनेच्या घटनेचा मिरजेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादा पवार गटाकडून निषेध व्यक्त करण्यात आला. पक्षाचे मिरज विधानसभा क्षेत्र प्रमुख महादेव दबडे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन करून तहसीलदारांना निवेदन दिले. याप्रकरणी दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.
पक्षाचे मिरज विधानसभा क्षेत्र प्रमुख महादेव दबडे, युवक अध्यक्ष राजू शेख हर्षल सावंत, विपुल झेडे, सुयश गुरव, नरेंद्र दबडे, विठ्ठल पोळ, दयानंद नागराळे, बसवराज देवरमणी यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. महादेव दबडे यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी मिरजेत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन केले. यानंतर तहसीलदारांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, मालवण जिल्हा सिंधुदुर्ग येथील राजकोट किल्ल्यावर नुकताच उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा दिनांक २६ ऑगस्ट रोजी दुर्घटनाग्रस्त झाला. ही बाब अत्यंत दुर्दैवी, वेदनादायी व मनाला संताप आणणारी आहे.
केवळ आठ महिन्यात येथील पुतळा पडतो हे अनाकलनीय आहे. येथे पुतळ्याची उभारणी करताना निष्काळजीपणा व अक्षम्य त्रुटी झाल्याचे नाकारता येत नाही. याचा मिरज विधानसभा क्षेत्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आम्ही जाहीर निषेध व्यक्त करतो. त्याचबरोबर पुतळा उभारणीच्या कामाची उच्चस्तरीय समितीमार्फत सखोल चौकशी करण्यात यावी. यामध्ये जे कोणी दोषी आढळतील त्यांच्यावर कठोर व कडक कायदेशीर कारवाई तत्काळ करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली असल्याची माहिती महादेव दबडे यांनी दिली.