मिरजेत दुचाकीच्या धडकेत बालक ठार ; टाकळी रोडवरील घटना

मिरज (प्रतिनिधी)

मिरज -टाकळी रोडवर दुचाकीने पाठीमागून धडक दिल्याने १६ वर्षे वयाच्या सायकल स्वार बालकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. अपघातानंतर बालकास तातडीने मिरज शासकीय रुग्णालयात नेण्यात आले. मात्र त्याचा मृत्यू झाला होता. या घटनेची नोंद मिरज शहर पोलीस ठाण्यात झाली असून पोलिसांनी चौगुले नामक दुचाकी चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. 

हर्षवर्धन भगवान कोकरे (वय १६ वर्षे, रा. सावंत प्लॉट, टाकळी रोड, मिरज) असे मृत बालकाचे नाव आहे. तो इयत्ता अकरावीच्या वर्गामध्ये शिकत होता. घडलेल्या घटनेबाबत शहर पोलिसात नोंद झाली आहे की, मयत हर्षवर्धन कोकरे हा त्याच्या सायकलवरून टाकळी रोडने मिरजेकडे पाणी आणण्यासाठी येत होता. यावेळी पाठीमागून आलेल्या एमएच १० डीडब्ल्यू ९९१४ या क्रमांकाच्या दुचाकीने त्याच्या सायकलला पाठीमागून धडक दिली. या अपघातात हर्षवर्धन कोकरे हा जखमी होऊन त्याचा मृत्यू झाला.

हर्षवर्धन कोकरे हा रक्ताच्या थारोळ्यात रस्त्यावर पडला होता. यावेळी ज्योतिबा दर्शना करुन मिरज तालुक्यातील आरगकडे निघालेल्या भाविकांनी त्याला वाहनातून मिरज शासकीय रुग्णालयात नेले. मात्र हर्षवर्धन कोकरे याचा मृत्यू झाला होता. अपघाताची माहिती मिळताच हर्षवर्धन कोकरे यांच्या नातेवाईक आणि टाकळी रोड परिसरातील नागरिकांनी मिरज शासकीय रुग्णालयात धाव घेतली होती. या अपघात प्रकरणी हर्षवर्धन कोकरे यांच्या वडिलांनी मिरज शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून पोलिसांनी चौगुले (वय ६०) नामक दुचाकी चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

About The Author