बांधकाम कामगारांना मिळणार प्रत्येकी ५ हजार- कामगार मंत्री सुरेश खाडे
दिवाळी निमित्त मंत्रिमंडळाकडून कामगार बांधवांसाठी महत्त्वपूर्ण निर्णय
मिरज (प्रतिनिधी)
महायुती सरकार हे सर्वसामान्यांचे सरकार आहे. गोरगरीब जनतेला न्याय मिळावा या हेतूने हे सरकार आश्वासक पावले उचलत आले आहे. यंदाची कामगार बांधवांची दिवाळी गोड व्हावी याकरीता राज्यातील महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे नोंदणी असलेल्या सक्रिय जीवित बांधकाम कामगारांना प्रत्येकी ५ हजार रुपयाचे सानुग्रह अनुदान अर्थसहाय्य देण्याचा निर्णय राज्याच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आल्याची माहिती राज्याचे कामगार मंत्री डॉ. सुरेशभाऊ खाडे यांनी दिली. राज्यभरात असे सुमारे २८ लाखाहून अधिक कामगार असून त्यांना शासनाच्या या अनुदान योजनेचा लाभ मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले.
याबाबत त्यांनी सांगितले की, दिनांक १० ऑक्टोबर रोजी मंत्रिमंडळ बैठक झाली. बैठकीत महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामधील नोंदित सक्रिय (जिवीत) बांधकाम कामगारांना ५ हजार रुपयांचे अर्थसहाय्य (सानुग्रह अनुदान) देणेबाबत निर्णय करण्यात आला. बांधकाम कामगारांचे सामाजिक व आर्थिक स्थैर्य जोपासण्याकरिता त्यांना अर्थसहाय्य देणे आवश्यक आहे. याबाबत सांगोपांग चर्चा करण्यात आली. मंडळामध्ये नोंदित सक्रिय (जिवीत) असलेले २८ लाख ७३ हजार ५६८ तसेच मंडळाच्या संगणक प्रणालीवर नोंदणी व नुतनीकरणाकरिता प्राप्त झालेल्या २५ लाख ६५ हजार १७ असे एकुण ५४ लाख ३८ हजार ५८५ बांधकाम कामगार आहेत. त्यापैकी नोंदित सक्रिय (जिवीत) कामगारांना अर्थसहाय्य देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या अर्थसहाय्याकरिता २ हजार ७१९ कोटी रुपये इतका खर्च मंडळाकडे जमा असलेल्या कामगार उपकरामधुन भागविण्यात येणारा आहे. कामगारांना त्यांचे कार्यान्वित असलेला बँक खात्याचे पासबुक, नोंदणी पुरावा या केवळ एका कागदपत्रावर अर्थसहाय्य उपलब्ध होणार असल्याचे त्यांनी सांगितले.