संदीप दिवाण यांचा गावच्या मातीशी जिव्हाळा कायम : जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी

शिराळा ( राजेंद्र दिवाण ) : पोलीस उप महानिरीक्षक संदीप दिवाण यांचा गावच्या मातीशी जिव्हाळा कायम आहे. त्यामुळे जीवनात त्यांना इतके मोठे यश मिळवता आले, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी केले. मांगले गावचे सुपुत्र संदीप गजानन दिवाण यांची पोलीस उपमहानिरीक्षक पदी पदोन्नती झाल्याबद्दल येथील ग्रामपंचायत , त्रिमुर्ती युथ फेडरेशन व ग्रामस्थांचे वतीने आयोजीत केलेल्या भव्य नागरी सत्कार समारंभात जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी बोलत होते. प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा पोलिस अधीक्षक संदीप घुगे उपस्थित होते.

येथील श्री मंगलनाथ मंदिराच्या सभागृहात झालेल्या कार्यक्रमात संदिप दिवाण यांना पदोन्नती मिळाल्याबद्दल मांगले ग्रामस्थांच्यावतीने जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांच्या हस्ते नागरी सत्कार करण्यात आला. त्यांची वाजत गाजत गावातून मिरवणूक काढण्यात आली. डॉ. राजा दयानिधी म्हणाले, पोलीस प्रशासनात आपली वेगळी इमेज तयार केलेले अधिकारी म्हणून श्री दिवाण यांची ख्याती आहे. जिल्हा पोलीस प्रमुख संदीप घुगे म्हणाले, गावाने केलेला सन्मान अभिमानस्पद आहे. प्रशासकिय अधिकारी म्हणून वेगळे काम प्रेरणादायी असल्याचे सांगितले.

यावेळी बोलताना सत्कारमूर्ती संदीप दिवाण म्हणाले, गावाने दिलेले प्रेम मागून मिळत नाही. त्यासाठी गावाशी नाळ जोडलेली असावी लागते. तसेच गावाकडच्या शाळेतील गुरुजनांची इच्छाशक्ती मोठी असल्यामुळे आज अधिकारी म्हणून मी उभा आहे. पुढील वर्षी माझ्या हस्ते आणखी अधिकारी झालेल्या तरुणांचा सत्कार करण्याची संधी मला मिळावी, अशी अपेक्षा व्यक्त करून स्पर्धा परीक्षेसाठी आवश्यक मार्गदर्शान व पुस्तके उपलब्ध करून देणार असल्याचे सांगितले. त्यामुळे तरुणांनी कोणताही न्यूनगंड न बाळाना स्पर्धा परीक्षेत उतरा असे आवाहन यावेळी त्यांनी केले.

यावेळी प्रशिक्षणर्थी जिल्हाधिकारी अमित रंजन, जिल्हा पोलीस प्रमुख संदीप घुगे, इस्लामपूरचे प्रांताधिकारी श्रीनिवास अर्जुन, पोलीस उपअधिक्षक मंगेश चव्हाण , शिराळ्याच्या तहसीलदार शामला खोत –पाटील, शिराळा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सिद्धेश्वर जंगम, सरपंच प्रल्हाद पाटील , उपसरपंच संजय जमदाडे यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम झाला . प्रारंभी स्वागत सदाशिव कुराडे व प्रास्ताविक सरपंच प्रल्हाद पाटील यांनी केले. तर वारणा साखर कारखान्याचे संचालक विजय पाटील, एस.पी.यादव, आर.एन.जगताप, प्रा भीमराव गराडे –पाटील, सदाशिव कुराडे, सुमित पाटील, अशोक पाटील ,सुधाकर पाटील यांची भाषणे झाली .

यावेळी मधुरा दिवाण, आटपाडी बार असोसिएशनच्या अध्यक्षा ॲड अनघा कुलकर्णी, कुरळप चे सरपंच डॉ मदन शेटे, विश्वास चे संचालक सुरेश पाटील, दत्तात्रय पाटील, यांचेसह अनेक मान्यवर उपस्थित होते.अनिल कुंभार यांनी आभार मानले .

About The Author