पालकमंत्री खाडेंकडून पक्षामध्ये हुकुमशाही सुरू – प्रा. मोहन वनखंडे

पुत्राला राजकारणात मोठे करण्यासाठी मला बाजूला सारत बैठका व कार्यक्रमातून डावलल्याचे केले आरोप

मिरज (प्रतिनिधी)

पालकमंत्री डॉ.सुरेशभाऊ खाडे यांच्या कडून भाजपा पक्षामध्ये हुकुमशाही सुरू आहे. स्वत: च्या मुलाला राजकारणात मोठे करण्यासाठी सुरुवातीला मला बाजूला सारले, आता तर भाजपाच्या बैठका आणि कार्यक्रमातून सुद्धा मला डावलले जात आहे, असे गंभीर आरोप भाजपा अनुसूचित जाती मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस प्रा.मोहन वनखंडे यांनी केले आहेत. मिरजमध्ये वनखंडे हे प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

ते म्हणाले, मी भाजपाकडे उमेदवारी मागितल्या नंतर मला कार्यक्रमापासून डावलले जात आहे. पालकमंत्र्यांच्या दबावामुळे हा सर्व प्रकार सुरू आहे. भाजपाचे वरिष्ठ नेते विनोद तावडे यांच्या मिरज मधील मीटिंग पासून सुद्धा मला बाजूला ठेवण्यात आलं. मात्र त्यानंतर विनोद तावडे यांची स्वतंत्र भेट घेऊन मी माझी व्यथा त्यांच्यासमोर मांडली. प्रदेशचे महत्त्वाचे पद माझ्याकडे असून सुद्धा मला भाजपाच्या कार्यक्रम आणि बैठका पासून मला डावलले जात आहे. या बाबत मी पक्षाध्यक्ष आणि वरिष्ठांच्याकडे माझी नाराजी व्यक्त केली करीत व्यथा मांडली आहे. कितीही अडीअडचणी आल्या तरी आगामी विधानसभा निवडणुकीत मिरजेतून महायुतीचा उमेदवार म्हणूनच लढेन असा विश्वास त्यांनी याप्रसंगी व्यक्त केला.

About The Author