मिरजेत रविवारी जिजाऊ पुरस्कारांचे वितरण; विविध क्षेत्रातील मान्यवरांचा होणार गौरव
प्रतिनिधी (मिरज)
शहरातील जिजाऊ चॅरिटेबल संस्थेच्या वतीने रविवारी 12 जानेवारी रोजी राजमाता जिजाऊ जयंती व पुरस्कार वितरण समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे. यंदाही विविध क्षेत्रात उल्लेखनिय कार्य करणाऱ्या समाज सेवकांना जिजाऊ पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष धनंजय भिसे यांनी दिली.
छत्रपती शिवाजी महाराज रस्त्यावरील आयएमए हॉलमध्ये सायं. साडे पाच वाजता हा समारंभ होणार आहे. पुरस्कार वितरण समारंभासाठी प्रमुख पाहूणे म्हणून जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तृफ्ती दोडमिसे, भारती सहकारी बँकेचे संचालक जितेशभैय्या कदम यांच्यासह माजी आमदार विक्रम सावंत, पोलिस उपाधीक्षक प्रणिल गिल्डा, मोहनराव शिंदे साखर कारखान्याचे अध्यक्ष मनोजबाबा शिंदे, मोहन मोहनकंडे सर बाजार समिती संचालक संग्राम पाटील उपस्थित राहणार आहेत. मान्यवरांच्या हस्ते जिजाऊंना अभिवादन आणि पुरस्कार वितरण होणार आहे. त्यानंतर पलूसच्या वासंती वासुदेव मेरु यांचे व्याख्यान होणार आहे.
जिजाऊ संस्थेच्या वतीने दिला जाणारा प्रतिष्ठेचा जिजाऊ आदर्श माता पुरस्कार यंदा माजी नगरसेवक संजय मेंढे यांच्या मातोश्री श्रीमती काशिबाई नायकू मेंढे यांना देण्यात येणार आहे. याशिवाय सांगलीतील संवादिनी ग्रुपच्या प्रमुख व समुपदेशक अर्चना मुळे यांना जिजाऊ सामाजिक पुरस्कार, शहरातील प्रसिध्द बसाप्पा हलवाईच्या संचालिका श्रीमती रेखा शंकरराव चौगुले यांना जिजाऊ उद्योजकता पुरस्कार, तरुण भारतचे तालुका प्रतिनिधी व ज्येष्ठ पत्रकार के.के.जाधव यांना कै. नामदेवराव भोसले स्मृती पुरस्कार तर डॉ. रणजीत शरद चिडगुपकर यांना जिजाऊ वैद्यकीय सेवा पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे. आयएमए हॉलमध्ये रविवारी १२ जानेवारी रोजी सायंकाळी साडेपाच वाजता पुरस्कार वितरण समारंभ होणार असून, नागरीकांनी या कार्यक्रमास उपस्थित रहावे, असे आवाहन धनंजय भिसे यांनी केले आहे.