खा. शरदचंद्र पवार यांचे हस्ते मिरजेत सिनर्जी ‘हृदयालय’चे उदघाटन
प्रसाद जगताप व डॉ. रवींद्र आरळी यांचे विशेष कौतुक करीत पुढील वाटचालीस दिल्या सदिच्छा
मिरज (प्रतिनिधी-विनायक क्षीरसागर)
मिरज येथील सुप्रसिद्ध असलेल्या सिनर्जी मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल येथे नव्यानेच सुरु होत असलेल्या “सिनर्जी हृदयालय” या हृदयरोगाशी संबंधित अत्याधुनिक विभागाचे उदघाटन राष्ट्रवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खा.शरदचंद्रजी पवार साहेब यांचे हस्ते झाले.
आरोग्य पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मिरज येथे सिनर्जी हॉस्पिटल, हे १५ ऑगस्ट २०२० रोजी कार्यान्वित झाले असून मागील ४ वर्ष्यांपासून यशस्वीपणे वाटचाल करीत आहे. पश्चिम महाराष्ट्रातील एक नावाजलेले हॉस्पिटल म्हणून अल्पावधीतच हे हॉस्पिटल नावारूपास आलेले आहे. २०० बेडचे क्षमता असलेल्या या हॉस्पिटलने आज पर्यंत ३० हजार पेक्षा जास्त रुग्णांना अत्याधुनिक व उच्च दर्जाची सेवा दिलेली आहे. सध्यस्थितीत या हॉस्पिटल मध्ये स्त्रीरोग,हृदयरोग, शस्त्रक्रिया,अस्थिरोग, नवजात शिशु व बालरुग्ण, मेंदुविकार, कर्करोग, मूत्ररोग, त्वचारोग, मेडिसिन, कान नाक घसा, असे अनेक अद्ययावत विभाग कार्यरत आहेत.तसेच ६० बेडचा अतिदक्षता विभाग, ७ मॉड्युलर ऑपरेशन थिएटर्स ,२४ तास आपत्कालीन सेवा विभाग अश्या सुविधा या हॉस्पिटलमध्ये उपलब्ध आहेत.
या उदघाटन प्रसंगी बोलताना खा.पवार म्हणाले, बारामती तालुक्यातील ढाकाळे सारख्या अत्यंत दुष्काळी भागातून,जिथे पिण्याच्या पाण्याची सोय सुद्धा उपलब्ध नाही,अश्या भागातून येऊन आरोग्य पंढरी असणाऱ्या मिरज येथे उच्च दर्जाचे हॉस्पिटल उभा केले त्याबद्दल प्रसाद जगताप व डॉ. रवींद्र आरळी यांचे विशेष कौतुक करावेसे वाटते. प्रसाद जगताप हे अत्यंत दूरदृष्टी असणारे उद्योजक आहेत. अत्यंत हलाखीच्या परिस्थितीतून त्यांनी हे सर्व काही उभा केलं आहे. सिनर्जी हे अत्यंत उच्च सेवा देणारे हॉस्पिटल आहे,आणि पुणे मुंबईच्या धर्तीवर या हॉस्पिटलचे व्यवस्थापन योग्य रीतीने झालेलं आहे.
प्रास्ताविकपर बोलताना मॅनेजिंग डायरेक्टर जगताप म्हणाले, आदरणीय पवार साहेब हे माझे आदर्श आहेत.त्यांच्यासारख्या महान राजकीय नेत्याने आमच्या विनंतीला मान देऊन हॉस्पिटलला भेट दिली याबद्दल आभार व्यक्त केले. या कार्यक्रमावेळी श्रीमती सुशीला जगताप यांनी छ.शिवाजी महाराज यांची प्रतिमा भेट देऊन शरद पवार साहेब यांचे स्वागत केले.
हॉस्पिटलचे चेअरमन डॉ.रवींद्र आरळी यांनी जास्तीत जास्त रुग्णांना अत्याधुनिक व उच्च दर्जाची सेवा देण्यासाठी आम्ही नेहमी प्रयत्नशील राहू अशी ग्वाही दिली. सिनर्जी हृदयालय हा हृदयरोगाशी निगडित आरोग्य सेवा देणारा विभाग आहे .या विभागामध्ये अँजिओग्राफी, अँजिओप्लास्टी,ओपन हार्ट सर्जरी, वाल्व रिप्लेसमेंट, हार्ट ट्रांसप्लांट अशा सर्व सेवा सुविधा या विभागामध्ये मिळणार आहेत.त्यामुळे आता रुग्णांना पुणे मुंबई ला जाण्याची गरज भविष्यात पडणार नाही, असेही त्यांनी नमूद केले.
कार्यक्रमाचे आभार मेडिकल डायरेक्टर डॉ.संजय साळुंखे यांनी व्यक्त केले. यावेळी सौ.पूजा जगताप, पार्थ जगताप, डॉ.रेणुका आरळी, सौ.मेघना कोरे, शहर अध्यक्ष संजय बजाज, राहुल पवार, डॉ. विराज लोकूर, डॉ.नाथनिएल ससे, हृदयालय विभागाचे प्रमुख डॉ.तुषार धोपाडे व डॉ प्रदीप देवकाते ,डॉ.विजय तुळजापूरकर, डॉ. बिपीन मुंजाप्पा, डॉ. सुरेश पाटील ,डॉ.सचिन जंगम, डॉ. रवींद्र सांगोलकर, डॉ. पुष्पा पाटील, डॉ.गौरव पवार, डॉ. राजकुमार खांबे, डॉ. श्रीनाथ पाटील, डॉ.माधवी धोपाडे, डॉ. शैलजा ससे, डॉ.विशाल पाटील, डॉ.स्वाती पाटील, डॉ. कैलास बरिदे तसेच वैद्यकीय अधिकारी, नर्सिंग स्टाफ व प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.