वयोश्री योजनेअंतर्गत मतदार संघातील वयोवृध्दांनी लाभ घ्यावा – महादेव दबडे
मिरज (प्रतिनिधी)
राज्य शासनाने ६५ वर्षावरील वृध्दांसाठी राबविलेल्या वयोश्री योजनेचा मिरज विधानसभा मतदार संघातील ६५ वर्षावरील वृध्दांनी लाभ घ्यावा, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) मिरज विधानसभा क्षेत्र प्रमुख महादेव दादा दबडे यांनी केले.
वड्डी ग्रामपंचायतीच्या लोकनियुक्त सरपंच डॉ. यशोधराराजे महेंद्रसिंह शिंदे व अजितदादा गटाचे मिरज विधानसभा क्षेत्र प्रमुख महादेव दबडे यांच्या संयुक्त विद्यमाने या योजनेचे पहिले शिबीर वड्डी येथे पार पडले. राज्यशासनाने राबविलेल्या योजनेपैकी ६५ वर्षावरील वयोवृध्दासाठी राबविलेली वयोश्री योजना ही महत्वपूर्ण आहे. या योजनेतंर्गत वयोवृध्दांना चष्मे, व्हीलचेअर्रसाठी डीबीटीव्दारे ३ हजार रूपयांचे अनुदान लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमादार होणार आहे. जिल्ह्यात ही योजना राबविण्याबाबत संबंधित विभागाने प्रचार प्रसार केलेला नसताना लोकनियुक्त सरपंच यशोधराराजे शिंदे व राष्ट्रवादी काँग्रस अजित पवार गटाचे मिरज विधानसभा क्षेत्र प्रमुख महादेव दबडे यांनी पुढाकार घेवून वृध्दांना या शासनाच्या योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी वड्डी येथे जिल्ह्यातील पहिले शिबीर घेतले.
याशिबिरामध्ये लाभार्थ्यांना योजनेचे मोफत अर्ज देण्यात आले. अंगणवाडी सेविका, आशा वर्कर यांच्याकडून अर्ज भरून घेण्यात येत आहेत. ग्रामपंचायत कार्यालय वड्डी येथे शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी लोकनियुक्त सरपंच यशोधराराजे शिंदे, मिरज विधानसभा क्षेत्र प्रमुख अजितदादा गटाचे महादेव दबडे, तालुकाध्यक्ष तानाजी दळवी, किरण मगदूम, अंगणवाडी सेविका, आशासेविका, आरोग्य सेविका, सर्व डॉक्टर स्टाफ उपस्थित होते.