वडार समाजाचा सुधीरदादांना संपूर्ण पाठिंबा ; सांगलीतील कार्यक्रमात ग्वाही
सांगली (प्रतिनिधी)
सांगलीतील समस्त वडार समाज आमदार सुधीरदादा गाडगीळ यांच्याच पाठीशी ठामपणे उभा राहील. त्यांना विक्रमी मतदान करेल, अशी ग्वाही येथील वडार कॉलनीत झालेल्या कार्यक्रमात समाजाच्या वतीने देण्यात आली. समाजाच्या मागणीनुसार वडार मजूर दांपत्य शिल्प उभारण्याचे आश्वासन सुधीरदादांनी यावेळी दिले.येथील वडार कॉलनीतील सरोदे चौकात आमदार गाडगीळ यांच्या प्रचारासाठी समाजाच्या वतीने कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. समाजाचे नेते रणजीत सावंत यांनी हा या कार्यक्रमाचे संयोजन केले होते. राष्ट्रवादीचे पदाधिकारी आणि वडार समाजाचे ज्येष्ठ नेते दयानंद इरकल यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी रणजीत सावंत यांनी प्रास्ताविकात सुधीरदादांनी वडार कॉलनी, रेल्वे स्टेशन आणि परिसरासाठी केलेल्या कामाची माहिती दिली. तसेच दादांना पुन्हा एकदा मोठ्या मताधिक्याने सांगलीतून निवडून द्यायचे आहे आणि त्यासाठी संपूर्ण समाज त्यांच्या पाठीशी उभा राहील अशी ग्वाही दिली. सावंत यांनी सांगितले की वडार मजूर दांपत्य शिल्प आपल्याला तयार करायचे असून ते सांगली रेल्वे स्टेशनच्या आवारात उभे करणार आहोत त्यासाठी दादांनी मदत करावी. हे शिल्प वडार समाजाच्या ऐक्याचे आणि कर्तुत्वाचे प्रतीक असेल.
दयानंद इरकल म्हणाले, लोकप्रतिनिधी निवडताना खूप काळजी घेणे आवश्यक आहे. कारण लोकप्रतिनिधी त्या त्या भागाचा विकास करीत असतात. त्यामुळे सुधीरदादांसारख्याच चारित्र्यसंपन्न, प्रामाणिक आणि कार्यतत्पर अशा लोकप्रतिनिधीलाच आपण निवडून दिले पाहिजे. समाजाच्या सर्व मागण्या पूर्ण करण्यासाठी आणि समस्या सोडवण्यासाठी सुधीरदादा गाडगीळ हेच पाठपुरावा करतील याची आम्हाला खात्री आहे.
यावेळी समाजातर्फे सुधीरदादांचा सत्कार करण्यात आला. सत्काराला उत्तर देताना सुधीरदादा म्हणाले, वडार समाज हा अत्यंत कष्टाळू आणि कर्तुत्ववान आहे. या समाजाचे सांगलीच्या विकासात फार मोठे योगदान आहे. अनेक मंदिरांपासून ते आयर्विन पुलापर्यंत सांगलीतील अनेक बांधकामे या समाजानेच केली आहेत. अशा समाजाच्या पाठीशी मी नेहमीच उभा राहीन. वडार मजूर दांपत्य शिल्प उभारण्यासाठी आवश्यक ती मदत निश्चितच करीन. माजी आमदार नितीन शिंदे, भाजपचे युवा नेते गौतम पवार,रणजित सावंत, महिला आघाडीच्या अध्यक्षा गीतांजली ढोपे पाटील, आश्रफ वांकर, अतुल माने, अजित नाईक, प्रमोद कलगुटगी, अमोल धोत्रे, सचिन जाधव आदी उपस्थित होते.