गोकुळने दरकपात मागे घ्यावी ; माजी आमदार काकासाहेब पाटील यांची मागणी
शिष्टमंडळासह गोकुळ पदाधिकाऱ्यांची घेतली भेट
निपाणी (प्रतिनिधी) निपाणी तालुक्यासह सीमाभागातील दूध उत्पादकांचे बहुतांशी दूध हे कोल्हापूर जिल्ह्यातील दूध संघांना विशेषतः गोकुळला जाते. मात्र दूध संघांनी अचानक कार्यक्षेत्राबाहेरील दुधाच्या खरेदी दरात तब्बल साडेचार रुपयांची कपात केली आहे. याचा दूध उत्पादक शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसत आहे. त्यामुळे ही दरकपात मागे घ्यावी. दुधाला लिटरमागे किमान दोन ते अडीच रुपये तरी वाढवून मिळावेत, अशी आग्रही मागणी माजी आमदार काकासाहेब पाटील यांनी गोकुळ दूध संघाकडे केली.
गुरुवारी माजी आमदार काकासाहेब पाटील, जिल्हा काँग्रेस अध्यक्ष लक्ष्मणराव चिंगळे, माजी जिल्हा पंचायत उपाध्यक्ष पंकज पाटील यांच्या नेतृत्वाखाली निपाणी तालुक्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाने कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक तथा गोकुळ दूध संघाच्या पदाधिकाऱ्यांची भेट घेतली. यावेळी ही मागणी करण्यात आली. गोकुळचे अध्यक्ष अरुण डोंगळे यांच्यासमवेत माजी आमदार पाटील यांनी चर्चा केली. यावेळी काकासाहेब पाटील म्हणाले, निपाणीसह सीमाभागातील उत्पादकांकडून गोकुळला मोठ्या प्रमाणात दूध पुरवठा होतो. 1983 साली वसंतदादा पाटील हे मुख्यमंत्री असताना महाराष्ट्र शासनाने सीमाभागातील दुधाला कोल्हापूरप्रमाणे दर देण्याचा आदेश काढला. त्यानुसार दुधाला समान दर मिळणे आवश्यक आहे. असे असताना दर कपातीच्या आदेशामुळे सीमाभागातील दूध उत्पादकांना दररोज आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे. तरीदेखील गोकुळची आर्थिक स्थिती विचारात घेता लिटरमागे दीड ते दोन रुपये दरकपात सहन करण्याची तयारी सीमाभागातील दूध उत्पादकांची आहे. मात्र उर्वरित दोन ते अडीच रुपये दर वाढवून मिळावा, अशी मागणी केली. तसेच या प्रश्नी पालकमंत्री हसन मुश्रीफ व आमदार सतेज पाटील यांची भेट घेण्याची तयारीही दर्शवली. लक्ष्मणराव चिंगळे यांनी, सीमाभागातून दूध पुरवठ्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी नेहमीच गोकुळला सहकार्य केले आहे. त्यामुळे ही अन्यायी दरकपात मागे घेऊन गोकुळने दूध उत्पादकांना सहकार्य करण्याचे आवाहन केले. शिष्टमंडळाच्या भावना ऐकून घेतल्यानंतर यावेळी गोकुळचे अध्यक्ष अरुण डोंगळे यांनी, यासंदर्भात संचालक मंडळाच्या बैठकीत सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन दिले.
यावेळी निकु पाटील, बाबुराव खोत, शशिकांत पाटील, अनिल कुरणे, नवनाथ चव्हाण, दत्तात्रय पाटील, शिवगोंड पाटील, बापूसाहेब चौगुले, काका शेळके, आनंदा शेवाळे, अभय पाटील, रमेश पाटील, बापू पाटील, विश्वास आबणे, दिलीप पटेकर, अशोक माने, पिंटू कोंडेकर, अमित खोत, राहुल पंचम यांच्यासह सौंदलगा, कुर्ली, कोगनोळी, हंचिनाळ, भिवशी भागातील शेतकरी उपस्थित होते