पालकमंत्री खाडे यांच्या हस्ते बेडगेत ९ कोटी २५ लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

मिरज मतदारसंघाच्या विकासासाठी भविष्यातही आशीर्वाद व सहकार्य मिळेल असा व्यक्त केला विश्वास

मिरज (प्रतिनिधी)

आजअखेर बेडगच्या विकासासाठी भरीव निधी मंजूर केला आहे. त्यातून विकासाची अनेक कामे मार्गी लागली आहेत. सामाजिक बांधिलकी जोपासत अविरतपणे जनसेवा करत असून, भविष्यातही बेडग गावच्या विकासकामांसाठी लागेल तेवढा निधी उपलब्ध करून देऊ, अशी ग्वाही पालकमंत्री ना. सुरेश खाडे यांनी बेडग येथे दिली. बेडगेत ९ कोटी २५ लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ संपन्न झाला यावेळी ते बोलत होते. यावेळी ग्रामस्थांनी आपुलकीने त्यांचा सत्कार करून आभार मानले.

पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांच्या माध्यमातुन व राजेंद्र नागरगोजे यांच्या प्रयत्नातुन बेडग गावातील सन- 2024-25 वर्षात मंजुर कामांचा शुभारंभ संपन्न झाला.यामध्ये मंदिर सुशोभिकरण करणे, रस्ता कॉक्रीटीकरण करणे, सोलर स्ट्रीट लाईट व सोलर हायमास्ट सोलर पथदिवे बसविणे, विविध रस्ते सुधारणा, समाज मंदिर दुरुस्ती सह इतर विविध कामे करण्यात आली. गजराज नवरात्र उत्सव मंडळ, बेडग येथे विसर्जन मिरवणूक सोहळ्यास उपस्थित राहून सर्वांना दसऱ्यानिमित्त खाडे यांनी सदिच्छा दिल्या.

खाडे पुढे म्हणाले, समाजातील सर्व घटकांना विकासाच्या प्रक्रियेत सामावून घेत जनहिताचे विविध प्रश्न मार्गी लावण्याचा सदोदित प्रयत्न केला आहे. मतदारसंघातील नागरिकांना पिण्याचे पाणी, शेती सिंचन, रस्ते, वीज, आरोग्य, शिक्षण व इतर सुविधा पुरवून सर्वसामान्यांचे जीवनमान सुधारण्यासाठी प्रयत्न केले आहेत. महायुती सरकारने महिला सक्षमीकरणावर भर दिला असून, माता-भगिनींसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना यासारख्या विविध योजना सुरू केल्या आहेत. विरोधकांना केवळ राजकारणात रस असून, आपण मात्र प्रत्यक्ष कृती करत विकासकामांवर भर दिला आहे. शासनाकडे विशेष प्रयत्न करून ग्रामीण भागाच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणात निधी खेचून आणला आहे. गावच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही. मिरज मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी भविष्यातही तुमचे प्रेम, आशीर्वाद व सहकार्य नक्कीच मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.