दुपारच्या जेवणाची  घेतली सुट्टी अन गारगोटी स्टेट बँकेने मागितली माफी….

गारगोटी (प्रतिनिधी) बँक ग्राहकांना ताटकळत ठेऊन  बँकेचे कर्मचारी जेवणासाठी किंवा चहासाठी बाहेर किंवा इतरत्र जाऊ शकत नाहीत,हा नियम सर्वच बँकांना लागू आहे.गारगोटी स्टेट बँकेतील कर्मचाऱ्यांना दुपारी जेवणासाठी काम थांबवणे चांगलेच महागात पडले आहे. या बँकेतील कर्मचाऱ्यांना एका जागरूक ग्राहकाने चांगलाच धडा शिकवला आहे.

      स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा गारगोटी, तालुका भुदरगड ही एक कोल्हापूर जिल्ह्यातील तालुका पातळीवरील मोठी शाखा आहे. या शाखेत दररोज नेहमी गर्दी असते आणि पूर्ण तालुक्यातील शेकडो ग्राहक विविध कामासाठी येत असतात. काही दिवसापूर्वी जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेचे सदस्य व अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे कार्यकर्ते  प्रशांत शरद पुजारी रा. गारगोटी हे दुपारी त्यांच्या एटीएम कार्ड संबंधातील एका कामासाठी सदर शाखेत गेले असता पूर्ण बँकेतील सर्व अधिकारी, कर्मचारी आपापल्या कामाच्या जागेवर नसल्याचे दिसले. उपस्थित ग्राहकांना आणि सिक्युरीटी गार्डना विचारले असता सर्व अधिकारी/कर्मचारी जेवायला गेल्याचे त्यांना समजले. त्यावेळी बँकेत बरेच ग्राहक ताटकळत कर्मचाऱ्यांची वाट बघत बसल्याचे दिसले. पूर्ण बँकच रिकामी बघून  प्रशांत पुजारी यांनी शाखा व्यवस्थापक यांच्याकडे जाऊन सदर बाब सांगायला गेल्यावर तिथे शाखा व्यवस्थापकही त्यांच्या केबिनमध्ये उपस्थित नव्हते. वास्तविक रिझर्व बँकेच्या नियमानुसार बँकेला दुपारच्या जेवणाची पूर्ण सुट्टी नसते. ग्राहकांच्या सेवेसाठी किमान एक तरी कर्मचारी ड्युटीवर असावा असा नियम आहे.

सदर शाखेतील कर्मचारी अधिकारी यांची बेफिकिरी बघून  प्रशांत पुजारी यांनी सरळ रिझर्व्ह बँकेला  मेल करून सविस्तर पुराव्यासह रीतसर तक्रार केली. रिझर्व्ह बँकेकडे तक्रार प्राप्त झाल्यावर त्यांनी बँकिंग ओंबड्समन यांच्याकडे तक्रार पाठवली. ओंबड्समन यांनी स्टेट बँकेच्या महाव्यवस्थापक यांना यासंदर्भात नोटीस पाठवून सविस्तर खुलाशासह कार्यवाही करण्याबाबत विचारणा केली.

 त्यानंतर स्टेट बँकेच्या  वरिष्ठापासून ते शाखा व्यवस्थापक पर्यंत बँकेतील सर्व सूत्रे पटापटा हलली. गारगोटी शाखा व्यवस्थापक यांनी बँकेत ताबडतोब स्टाफ मीटिंग घेवून पुन्हा अशा चुका होऊ नयेत आणि ग्राहकांच्या सेवेच्या बाबतीत हयगय होणार नाही अशा प्रकारचा सक्त ताकीद देणारा कार्यालयीन आदेश काढला आणि तुम्हाला तसेच इतर ग्राहकांना झालेल्या त्रासाबद्दल आम्ही माफी मागत आहोत असा फोन करून  प्रशांत पुजारी यांना सांगितले आणि तसे लेखी ईमेलपत्र ही पाठवले. या मुळे आता भुदरगड तालुक्यातील बँक ग्राहकांना पूर्ण दिवसभर बँकेची सेवा मिळणार आहे.याबद्दल प्रशांत  पुजारी यांचे कौतुक होत आहे.

About The Author