म्हैशाळमध्ये विजेचा शॉक लागून बाप-लेकासह तिघांचा मृत्यू तर एकजण जखमी
पालकमंत्री खाडेंनी जखमीची भेट घेत मृत्यू पावलेल्या प्रत्येकास पाच लाखाची तात्काळ आर्थिक मदत केली जाहीर
मिरज (प्रतिनिधी)
शेतात वैरण आणण्यासाठी गेलेल्या एकाच कुटुंबातील तिघांचा तुटून पडलेल्या वीज वाहक तारेमुळे विजेचा तीव्र धक्का लागल्याने मृत्यू झाला. रविवारी सकाळी म्हैसाळ (ता.मिरज) येथे ही घटना घडली. वडील व लहान मुलासह तिघांचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. पारिसनाथ मारुती वनमोरे (वय ४०), मुलगा साईराज पारिसनाथ वनमोरे (वय १२) व पारिसनाथ यांचे चुलत भाऊ प्रदीप श्रीकृष्ण वनमोरे (वय ३५) या तिघांचा या दुर्घटनेत मृत्यू झाला आहे. तर पारिसनाथ यांचा दुसरा मुलगा हेमंत वनमोरे (वय १५) यासही विजेचा धक्का बसला आहे. सर्वजण म्हैसाळ मधिल सुतारकी मळा भागातील वनमोरे मळ्यातील सर्व रहिवासी आहेत.
याबाबत ग्रामस्थांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, पारिसनाथ आणि त्यांची दोन्ही मुले हेमंत आणि साईराज हे तिघे शेतात वैरण काढण्यास गेली. वडील पारिसनाथ आणि मोठा मुलगा हेमंत हे पुढे गेले होते. तर साईराज हा त्यांच्या मागे थोड्या अंतरावर होता. शेतात पाऊस झाल्याने पाणी व चिखल सदृश्य स्थिती निर्माण झाली होती. या ठिकाणी विद्युत तार तुटून पडली असल्याचे या तिघांनाही समजले नाही. पारिसनाथ यांना सर्वप्रथम विजेचा धक्का बसला. तर हेमंत यासही विजेचा धक्का बसल्याने तो बाजूला फेकला गेला. पारिसनाथ हे त्याच ठिकाणी कोसळले. याचवेळी पारिसनाथ यांचा दुसरा मुलगा साईराज हा तेथे आला असता त्यासही विजेचा धक्का बसला.
भाऊ आणि दोघा पुतण्यांना विजेचा धक्का बसल्याचे लक्षात येताच प्रदीप वनमोरे हे धावत वीज प्रवाह बंद करण्यासाठी गेले. मात्र दुर्दैवाने पारिसनाथ यांना विजेचा धक्का बसला होता त्यापासून थोड्या अंतरावर प्रदीप यांनाही विजेचा धक्का बसला. तेही त्या ठिकाणी कोसळले. या दुर्दैवी घटनेत पारिसनाथ, साईराज व प्रदीप वनमोरे या तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाला. तर हेमंत हा विजेच्या धक्क्याने बाजूला फेकला गेला. हेमंत वनमोरे या मुलाची प्रकृर्ती चिंताजनक असल्याने त्याला तात्काळ मिरजेतील वैद्यकीय महाविद्यालयाच्या रूग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले. मिरज ग्रामीण पोलीस स्टेशनचे मंडळ पोलीस निरीक्षक बी. ए. तळेकर व पोलीस उपनिरीक्षक सुनील गुरव यांनी घटनास्थळी भेट देऊन सविस्तर माहिती घेतली असून पुढील तपास सुरु आहे.
पालकमंत्र्यांकडून कुटुंबाचे सांत्वन..
म्हैसाळ येथे घडलेली दुर्दैवी घटना समजताच पालकमंत्री डॉ. सुरेशभाऊ खाडे यांनी शासकीय रूग्णालयात भेट देउन जखमी मुलाची प्रकृती व उपचारांबाबत महीती घेतली. वनमोरे कुटुंबाचे सांत्वन केले. सदरचा प्रकार राज्य वीज वितरण कंपनीच्या हलगर्जीपणामुळे घडला असून कंपनीच्या अधिकार्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी नातेवाईकांनी यावेळी केली आहे. मृत तिघांच्या वारसांना प्रत्येकी ५ लाखाची मदत मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा करुन देण्यात येईल असे पालकमंत्री डॉ. सुरेशभाऊ खाडे यांनी जाहीर केले. जखमी हेमंत वनमोरे या मुलाच्या उपचारासाठी लागणारा सर्व खर्च देणेची घोषणा मंत्री डॉ. खाडे यांनी केली. तसेच या प्रकरणातील दोषींवर सखोल चौकशी करुन कडक कारवाई करण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत.