सांगलीतील भारती हॉस्पिटलमध्ये तंबाखू मुक्त युवा अभियानाचे उद्घाटन
मिरज (प्रतिनिधी)
येथील भारती विद्यापीठ मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटलमध्ये तंबाखु मुक्त युवा अभियानाचे उद्घाटन करण्यात आले. केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्याहस्ते उद्घाटनाचा ऑनलाईन कार्यक्रम संपन्न झाला. भारती हॉस्पिटलमध्ये मानद संचालक डॉ.एच.एम.कदम, डीन डॉ.सारा धनवडे, वैद्यकीय अधीक्षक डॉ.अजित जोशी यांनी तंबाखू मुक्ती सेंटरचे उद्घाटन केले.
राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमांतर्गत युवकांना तंबाखुपासून बाजूला ठेवण्यासाठी हे अभियान दोन महिने राबविण्यात येणार आहे. ‘से नो टु टोबॅको’ या टॅगलाईनखाली हे अभियान गतिमान होणार असल्याचे डॉ.एच.एम.कदम यांनी सांगितले. कारण सुमारे १३ लाख माणसे दरवर्षी तंबाखुने मरतात. तंबाखू मुक्तीचा संकल्प सर्वांनी करावा असे आवाहन यावेळी हॉस्पिटलमध्ये करण्यात आले.
तंबाखूचे व्यसन टाळायला हवे. आरोग्याच्या बाबतीत जागरूक राहा. माणसं देशाची संपत्ती आहेत. फक्त ऐकून जावू नका. अंमलबजावणी करा असा संदेश या ऑनलाईन कार्यक्रमात देण्यात आला. प्रमुख पाहुणे मंत्री प्रतापसिंह जाधव यांनी तंबाखू मुक्तीची शपथ दिली. जीवनात तंबाखूचे सेवन करणार नाही आणि नातेवाईकांनाही त्यापासून दूर ठेवणार असल्याचे सांगितले.
मंत्री जाधव म्हणाले, तंबाखू मुक्त देश आपणास करायचा आहे. स्वस्थ भारत तयार करायचं आहे. जागरूकता करण्यासाठी हे अभियान चालू आहे. युवकांचे प्रबोधन करणे आवश्यक आहे. गावापासून याची सुरुवात करायची आहे यामुळे नक्कीच येणारी पिढी व्यसनमुक्त बनेल. भारती हॉस्पिटल तुरची व सांगलीवाडी येथेही सेंटरचे उद्घाटन झाले. यावेळी उपवैद्यकीय अधीक्षक डॉ.शिल्पा गायकवाड, डॉ.नितीन पाटील, डॉ.दशरथ सावंत, डॉ.विद्या जाधव यांच्यासह सर्व डॉक्टर उपस्थित होते. भारती हॉस्पिटलच्या सांगलीवाडीत प्रा.डॉ. गिरीश धुमाळे व ग्रामीण रुग्णालय तुरची येथे डॉ.मिनाक्षी सावंत यांच्याहस्ते उद्घाटन करण्यात आले.