तरूण विद्यार्थ्यांनी अंमली पदार्थांपासून दूर राहणे हिताचे – न्या. आर. एस. वानखेडे

मिरजेत वॉन्लेस कॉलेज ऑफ नर्सिंग मधील विद्यार्थ्यांसाठी कायदेविषयक मार्गदर्शन शिबीर उत्साहात

मिरज (प्रतिनिधी)

तरूणाईने व्यसन आणि अंमली पदार्थाच्या विळख्यात न अडकता आपले आणि पर्यायाने भारत देशाचे भविष्य उज्वल करावे. आपले जीवन सुंदर आहे. अंमली पदार्थांपासून दूर राहून आपले जीवन सुंदर बनवा. आरोग्याला महत्त्व द्या, व्यायाम करा, खेळ खेळा पण अंमली पदार्थांना थारा देऊ नका, असे प्रतिपादन न्या.आर. एस. वानखेडे यांनी केले. सांगली जिल्हा विधी सेवा प्राधिकरणच्या निर्देशानुसार तालुका विधी सेवा समिती मिरज व वकील बार संघटना मिरज यांचे संयुक्त विद्यमाने जागतिक युवा दिनाचे औचित्य साधून मिरजेत वॉन्लेस कॉलेज ऑफ नर्सिंग मधील विद्यार्थ्यांसाठी कायदेविषयक मार्गदर्शन शिबीर आयोजित केले होते. यावेळी ते बोलत होते.

शिबिरात प्रमुख वक्ते म्हणून ॲड.ए. ए. कोपर्डे यांनी अंमली पदार्थाविरोधी असणाऱ्या कायदयाची तर ॲड. एस. टी. शिंदे यांनी रॅगिंगविरोधी कायद्याची माहिती उपस्थित विद्यार्थी आणि शिक्षकांना दिली. यावेळी वकील बार संघटना, मिरज चे अध्यक्ष ॲड. एम के खोत यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना जागतिक युवा दिनानिमित्त शुभेच्छा देताना, आजचा युवक ज्ञान आणि विज्ञानाच्या विश्वात वावरणारा असून मानवी मुल्ये आणि मानवी विकासाबाबत त्याला चांगली जाण आहे. विज्ञान – तंत्रज्ञानाच्या माध्यमातून जगातील अनेक समस्यांची उत्तरे शोधण्याची क्षमता त्याच्यात आहे. या क्षमतेचा उपयोग तो जगात शांतता प्रस्थापित करण्यासाठी निश्चितपणे करू शकतो.” असे सांगितले.

यावेळी मिरज वकील बार संघटनेचे उपाध्यक्ष ॲड. प्रसाद खटावकर, सचिव ॲड.प्रविण पाटील, सहसचिव ॲड.विनयकुमार पाटील, ॲड. रविंद्र लोणकर, कॉलेजच्या उपप्राचार्या श्रीमती उज्वला पारकर, वरीष्ठ प्राध्यापक प्रदिप अही इतर शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, विधी सेवा समितीचे शितल पाटील, बंडू मिसाळ उपस्थित होते.

About The Author