विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्व फुलवणारे व्यासपीठ म्हणजे राष्ट्रीय सेवा योजना : डॉ. पोपटराव माळी

कन्या महाविद्यालय मिरज येथे ‘विद्यार्थ्यांच्या व्यक्तीमत्व विकासात राष्ट्रीय सेवा योजनेची भूमिका’ या विषयावर व्याख्यान प्रसंगी केले प्रतिपादन

मिरज (प्रतिनिधी)

महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना राष्ट्रीय सेवा योजनेत सहभाग घेतल्याने आत्मविश्वास, जिद्द, नेतृत्व गुण, सामाजिक बांधिलकी इत्यादी गुणांचा विकास होतो. युवकांच्या प्रभावी व्यक्तिमत्त्वातूनच समाजाची उन्नती होत असते. त्यामुळे राष्ट्रीय सेवा योजना हे विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्व फुलवणारे एक व्यासपीठ आहे असे प्रतिपादन राष्ट्रीय सेवा योजना सांगली जिल्हा समन्वयक डॉ. पोपटराव माळी यांनी केले. मिरजेतील कन्या महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना दिनानिमित्त ‘विद्यार्थ्यांच्या व्यक्तीमत्व विकासात राष्ट्रीय सेवा योजनेची भूमिका’ या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी ते वक्ते म्हणून बोलत होते. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. उल्हास माळकर अध्यक्षस्थानी होते.

या कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक रासयो कार्यक्रम अधिकारी डॉ. माधुरी देशमुख यांनी केले. डॉ. संतोष शेळके यांनी वक्त्यांचा परिचय करून दिला. डॉ. माळी यांनी बोलताना राष्ट्रीय सेवा योजनेची ध्येये, उद्दीष्टे, कार्यप्रणाली, त्याद्वारे राबविण्यात येणारे विविध उपक्रम व त्यातून फुलत जाणारे व्यक्तिमत्व याबाबत सविस्तर विवेचन केले. याबरोबरच प्रत्येक स्वयंसेवकाने वेळ, कर्तव्य व नैतिकता या त्रिसूत्रीचा वापर केल्यास यशस्वी होता येते असा मंत्रही दिला.

मनात कोणताही पूर्वग्रह न बाळगता देश व सामाजिक बांधिलकी म्हणून विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय सेवा योजनेत सक्रिय राहिले पाहिजे. त्यातूनच विद्यार्थी समृद्ध होतो, असे विचार डॉ. उल्हास माळकर यांनी अध्यक्षीय मनोगतातून केले. आभार प्रा. डॉ. मंजिरी कुलकर्णी यांनी मानले. प्रा. पूजा कांबळे यांनी सूत्रसंचालन केले. याप्रसंगी कनिष्ठ विभाग रासयो कार्यक्रम अधिकारी प्रा. तुषार पाटील, प्रा. रमेश कट्टीमणी, प्रा.क्षितिज जाधव, इतर प्राध्यापक व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

About The Author