इचलकरंजीत 23 फेब्रुवारी पासून नव तेजस्विनी महोत्सव
कोल्हापूर (प्रतिनिधी)
महिला आर्थिक विकास महामंडळ व इचलकरंजी महानगरपालिकेच्यावतीने 23 ते 26 फेब्रुवारी या कालावधीत वर्धमान चौक, वंदे मातरम क्रीडांगण, इचलकरंजी येथे नव तेजस्विनी महोत्सव होणार असल्याची माहिती माविमचे जिल्हा समन्वय अधिकारी सचिन कांबळे यांनी दिली.या महोत्सवाचे उद्घाटन 23 फेब्रुवारीला दुपारी चार वाजता जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या हस्ते होणार असून इचलकरंजी महानगरपालिकेचे आयुक्त ओमप्रकाश दिवटे, उपायुक्त तैमूर मुलानी, नाबार्डचे सहाय्यक महाव्यवस्थापक आशुतोष जाधव, जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक गणेश गोडसे उपस्थित राहणार आहेत.
या महोत्सवात शंभर बचत गटाचे स्टॉल सहभागी होणार असून बचत गटातील महिलांनी तयार केलेले लोणची, पापड, कोल्हापुरी चप्पल, कोल्हापुरी मसाले, गूळ, नाचणी, तांदूळ, मातीची नक्षीदार भांडी, साड्या, ज्वेलरी, महिला व लहान मुलांचे कपडे आणि खेळणी, बिस्किटे, हर्बल प्रोडॉक्ट, हळद, बेदाणे आदींसह विविध खाद्यपदार्थांची रेलचेल असणार आहे. या महोत्सवात प्रदर्शन व विक्री सकाळी 9 ते रात्री 9 या कालावधीत होईल. बचत गटातील महिलांना नवीन उद्योग व्यवसाय करण्याबाबतचे मार्गदर्शन व आर्थिक सहाय्यतेबाबत माहितीही यावेळी महिलांना माविम, शिवाजी विद्यापीठ व विविध बँकांच्या वतीने देण्यात येईल. नागरिकांनी या प्रदर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहनही सचिन कांबळे यांनी केले आहे.