स्वच्छता पंधरवडा निमित्ताने मिरजेतील कन्या महाविद्यालयात विविध उपक्रम
मिरज (प्रतिनिधी)
भारत सरकार व महाराष्ट्र शासनाच्या वतीने दि.१७ सप्टेंबर ते १ ऑक्टोबर या कालावधीत ‘स्वच्छता ही सेवा’ हा उपक्रम सर्वत्र राबविला गेला. या उपक्रमांतर्गत मिरजेतील कन्या महाविद्यालय राष्ट्रीय सेवा योजना व राष्ट्रीय छात्र सेना विभागामार्फत विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. या मोहिमेत विद्यार्थिनींकडून शिवाजीनगर मधील ऑक्सिजन पार्क व आजूबाजूचा परिसर तसेच महाविद्यालय परिसरात स्वच्छता करण्यात आली. परिसरातील गाजर गवत काढून, कचरा व प्लॅस्टिक गोळा करून संपूर्ण परिसर स्वच्छ करण्यात आला. तसेच परिसर नेहमी स्वच्छ ठेवण्याबाबत नागरिकांना आवाहन करण्यात आले. जमा झालेले प्लॅस्टिक पर्यावरण संवर्धनासाठी काम करणाऱ्या पृथ्वी झिरो वेस्ट मॅनेजमेंट फौंडेशन या संस्थेला देण्यात आले.
या मोहिमेचा भाग म्हणून पोस्टर व रांगोळी स्पर्धा घेण्यात आल्या. यासाठी ‘स्वच्छ भारत-समृद्ध भारत’ हा विषय देण्यात आला होता. या दोन्ही स्पर्धेत एन.एस.एस कॅडेट्स व एन.एस.एस स्वयंसेविका मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. विजेत्या स्पर्धकांना प्रमाणपत्र व बक्षिसे देण्यात आले. दि. २ रोजी राष्ट्रपिता महात्मा गांधी तसेच लाल बहादूर शास्त्री जयंतीच्या निमीत्ताने त्यांच्या प्रतिमेस अभिवादन करण्यात आले. या दिनाचे औचित्य साधून विद्यार्थ्यांनी काढलेल्या पोस्टर्स चे प्रदर्शन भरवण्यात आले. याचे उदघाटन संस्थेचे सचिव श्री. राजू झाडबुके यांच्या हस्ते झाले. यावेळी प्राचार्य डॉ. उल्हास माळकर उपस्थित होते.
वरील सर्व उपक्रमांची नोंद माय भारत पोर्टल वर करण्यात आली. या सर्व उपक्रमांचे संयोजन रासयो कार्यक्रम अधिकारी डॉ. माधुरी देशमुख, एनसीसी प्रमुख प्रा. नलिनी प्रज्ञासूर्य, डॉ. मंजिरी कुलकर्णी, प्रा. रमेश कट्टीमणी, डॉ. बाबासाहेब सरगर, डॉ. शबाना हळंगळी, डॉ. संतोष शेळके, प्रा. क्षितिज जाधव, प्रा. पूजा कांबळे यांनी केले.