गौराईच्या निमित्ताने मिरजेतील लाड कुटुंबियांच्या घरी साकारली पंढरीची वारी
आकर्षक सजावट पाहण्यासाठी गणेशभक्तांची मोठी गर्दी
मिरज (प्रतिनिधी)
कोणताही सण साजरा करताना जास्तीत जास्त उत्साहात सर्व कुटुंबीय त्यात सहभागी होत असतात अशी आपली परंपरा आहे. दिवाळी असो, नवरात्री असो वा गणेशोत्सव असो प्रत्येकजण आपापल्या परीने जास्तीत जास्त आनंदात हे सण साजरा करताना दिसतो. पण काहीजण तन.मन आणि धन लावून अशा सणांमध्ये काहीतरी वेगळेपण दाखवून देण्यासाठी आटोकाट प्रयत्न करतात व अथक परिश्रम घेतात.
मिरजेतील सुभाषनगर रस्त्यावर दत्त कॉलनी मधील लाड कुटुंबीय देखील गौरी-गणपतीचा सण मोठ्या भक्तिभावाने साजरा करतात. गौराईच्या आगमनाच्या निमित्ताने या कुटुंबातील सौ.अनुजा लाड या गेली काही वर्षे घरी अतिशय सुंदर असे भव्यदिव्य व आकर्षक देखाव्याचे सेट उभे करीत असतात. त्यांच्या घरातील गौरी सणाचा देखावा पाहण्यासाठी परिसरातील महिला-भगिनी दरवर्षी मोठी गर्दी करत असतात.
यावर्षीही गौराईच्या आगमनाच्या निमित्ताने सौ.अनुजा लाड यांनी घरी पंढरीची वारी श्री गणेशाच्या दर्शनाला येत असल्याचा भव्य-दिव्य व अत्यंत आकर्षक असा देखावा तयार केला होता. या वारी मधील सर्वच मूर्ती अत्यंत रेखीव व अक्षरशः जिवंतपणा असल्याचे भासत होते. आकर्षक अशा मूर्ती, फुलांची रांगोळी, दिव्यांचा झगमगाट, मंद आवाजात लावलेली भक्तिगीते यामुळे एक वेगळ्याच विश्वात गेल्याचे जाणवत होते. हा देखावा उभा करण्यासाठी सौ.अनुजा लाड व त्यांचे कुटुंबीय हे गेले दोन महिने तयारी करत होते. महिनाभर दिवसरात्र अथक परिश्रम करून त्यांनी एक सुंदर असा सेट उभा केला होता. हे सर्व करण्यासाठी जवळपास लाखभर रुपये लाड कुटुंबीयांनी खर्च केले आहेत. देखावा पाहण्यासाठी बुधवारी रात्री उशिरापर्यंत लाड यांच्या बंगल्यात महिलांनी मोठी गर्दी केली होती. याबाबत बोलताना सौ.अनुजा लाड यांनी दरवर्षी गौराईच्या निमित्ताने वेगवेगळी थीम घेऊन देखावा तयार करत असल्याचे व याकामी घरातील सर्वांचेच व परिसरातील मैत्रिणींचे पाठबळ आणि मदत मिळते असे सांगितले. खूप दगदग होते मात्र जेंव्हा देखावा पूर्ण होतो व सर्वाना आवडतो तेंव्हा या परिश्रमाचे चीज झाल्याचे समाधान होते असे त्यांनी सांगितले.