सदलगा येथे गॅस सिलेंडर स्फोटात एकाचा मृत्यू : ३ गंभीर

सदलगा (प्रतिनिधी):- सदलगा ता. चिक्कोडी येथे गॅस सिलेंडरची गळती होऊन झालेल्या स्फोटात एकाचा मृत्यू झाला. तर अन्य एका कामगारासह दोन लहान मुलीसह ३ जण गंभीर जखमी झाले. सूर्यकांत शेळके वय ५५ रा. नांदेड असे मृताचे नाव आहे.

याबाबत अधिक माहीती अशी की, सदलगा शहरातील बांधकामासाठी नांदेड महाराष्ट्र येथून कामगार आले होते. राहत्या खोलीत गॅस सिलेंडरची पाईप कट झाल्याने रात्रभर गॅसची गळती झाली. खोलीमध्ये पहाटे विद्युत लाईट लावताना गॅसचा भयानक स्फोट झाला. यात शेळके यांचा मृत्यू झाला. आजूबाजूच्या भिंतीला तडे जाऊन घरचा दरवाजा सुमारे १५ ते २० फुटापर्यंत दूरवर जाऊन पडला. तसेच घरालगत असलेल्या घरातील दोन मुलींच्या पायावर भिंत पडून त्याही जखमी झाल्या. घटनेनंतर सदलगा शहरातील अग्निशमन दलाचे कर्मचारी व एन डीआरएफ टीमच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली. जखमी झालेल्या सर्वांना चिकोडी उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

घटनास्थळी आम. गणेश हुक्केरी, डीवायएसपी गोपाळकृष्ण गौडर, चिक्कोडी सापीआय रमेश चौगला, उपनिरीक्षक शिवकुमार बिरादार, तलाठी निलकंठ खाडे, नगरसेवक बसवराज गुंडकल्ले यांच्यासह पोलीस अधिकाऱ्यांनी भेट दिली.

About The Author