मिरजेतील ‘सेवासदन’मध्ये निवृत्त लष्करी अधिकाऱ्याचे अवयवदान

तीन तासात अवयव पुण्यात पोहोचवले, ग्रीन कॉरिडॉरद्वारे कामगिरी
मिरज (प्रतिनिधी)
सेवासदन लाईफलाईन सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलच्या टीमने आणखी एक उल्लेखनीय कामगिरी करून मिरजेच्या वैद्यकीय क्षेत्रात मानाचा तुरा खोवला आहे. सेवासदनचे सर्वेसर्वा डॉ. रविकांत पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांनी तसेच ऑर्गन रिट्राईव्हल टीम, सह्याद्री – हॉस्पिटल पुणे येथील निष्णात स्टाफने ब्रेनडेड रुग्णाचे लिव्हर व त्वचा हे अवयव गरजू रुग्णाला जीवनदान देण्यासाठी अवघ्या साडेतीन तासातच पुण्याला सह्याद्री हॉस्पिटलमध्ये पोचविले. मिरजेच्या वैद्यकीय क्षेत्रात अशी कामगिरी पहिल्यांदाच झाली असून त्याचा मान सेवासदनला मिळाला आहे.

अधिक माहिती अशी कि, म्हैसाळ येथील निवृत्त लष्करी अधिकारी कॅप्टन लक्ष्मण रामचंद्र शिंदे (वय ७०) यांनी भारतीय लष्करात प्रदीर्घ काळ उत्तम सेवा बजावली. निवृत्ती नंतरही त्यांनी सामाजिक कार्यात आपल्या कामाचा ठसा उमटवला होता. माजी सैनिक संघटना, म्हैसाळचे ते अध्यक्ष होते. त्यांना त्रास होऊ लागल्याने दि. १६ ऑगस्ट रोजी मिरजेतील सेवासदन हॉस्पिटल मध्ये उपचारांसाठी दाखल मात्र (दि.२९) ऑगस्ट रोजी रात्री डॉक्टर्सनी सदर रुग्ण ” ब्रेन डेड ” असल्याचे सांगितले. त्यानंतर रुग्णांच्या नातेवाईकांशी सेवासदन च्या डॉक्टर्सनी चर्चा केली. देशहित व सामाजिक कार्याचा वसा प्रथमपासूनच जपलेल्या कॅप्टन शिंदे यांनी आपले अवयव दान करण्यात यावेत अशी इच्छा पूर्वीच व्यक्त केली होती. आपल्या वडिलांच्या इच्छेचा मान ठेवून त्यांच्या मुलांनी अवयव दान करण्यास तात्काळ संमती दिली व त्यानंतर सेवासदन च्या टीमचे युद्ध पातळीवर काम सुरु झाले.

डॉ.रविकांत पाटील, डॉ. अमृता दाते, डॉ.दीपा पाटील, श्री .योगेश पाटील ,डॉ. मयुरेश दातार यांच्यासह सह्याद्री हॉस्पिटल पुणे यांची अवयव दान पुनर्प्राप्ती करणारी टीम, सेवासदन च्या ओटी स्टाफ मधील पॉल चोको, शीतल मोहिते, अंतर माने, प्रथमेश पवार, विनायक ढोबळे, अनिकेत बसवर , महेश लोणकर, हर्षवर्धन सुतार, ज्योती पवार, सुनील ऐवळे यांनी रुग्णाचे लिव्हर व त्वचा पुण्याला सह्याद्री हॉस्पिटलकडे गरजू रुग्णांना जीवनदान देण्यासाठी पाठविण्याची तयारी सुरु केली. सेवासदनच्या प्रशासकीय विभागातील सुनील जाधव, सौरभ पाटील, निखिल पेटकर, सदाशिव पाटील यांनी यासाठी बाहेरील लागणारी सर्व यंत्रणा तातडीने उभी करण्यासाठी मोलाचे परिश्रम घेतले. पोलीस प्रशासनाशी व सह्याद्री हॉस्पिटल, पुणे यांच्याशी संपर्क साधून तातडीने सर्व व्यवस्था करण्यात आल्या. यासाठी सह्याद्री हॉस्पिटलची सुसज्ज व वैद्यकीय टीम असलेली रुग्णवाहिका बोलाविण्यात आली तर सोबत लागणारी सामुग्री नेण्यासाठी स्पेशल इनोव्हा गाडीची व्यवस्था करण्यात आली.

अवयव काढून ते पाठविण्यासाठी सकाळी रुग्णाला ऑपरेशन थियेटर मध्ये नेण्यात आले व केवळ अर्ध्या तासात सर्व प्रक्रिया पूर्ण करून अवयव सर्व ती काळजी घेऊन ऍम्ब्युलन्स मध्ये ठेवण्यात आले. तत्पूर्वी सेवासदन चे डॉक्टर्स व सर्व स्टॅफ यांनी या लष्करी अधिकाऱ्याला राष्ट्रगीत गाऊन व सलामी देऊन भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. पोलीस प्रशासन व वाहतूक शाखेने यंत्रणा तयारच ठेवली होती. अवयव घेऊन निघालेली ऍम्ब्युलन्स नांद्रे मार्गे अवघ्या साडेतीन तासात म्हणजेच बारा वाजता पुण्यात सह्याद्री हॉस्पिटलला पोचली व सेवासदनची एक मोहीम यशस्वीपणे पार पडली.

About The Author