मिरजेत खाडे स्कूलचे संचालक स्व.दत्ता (अण्णा) खाडे यांच्या जयंतीनिमित्त वृक्षारोपण
कुकटोळी गावातील गिरलिंग डोंगरावर करण्यात आले वृक्षारोपण
मिरज (प्रतिनिधी)
दास बहुउद्देशीय विश्वस्त संस्था संचलित मातोश्री तानुबाई दगडू खाडे इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेज मिरज व पब्लिक स्कूल मालगाव यांच्या संयुक्त विद्यमाने संस्थेचे स्व.संचालक दत्ता (अण्णा) खाडे यांच्या ७४ व्या जयंतीनिमित्त संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी स्वाती सुशांत खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली कुकटोळी गावातील गिरलिंग या डोंगरावरती चिंच, शिसव, बांबू, बोर, कांचन, करंज, कवट यासारख्या देशी झाडांचे विद्यार्थ्यांच्या हस्ते वृक्षारोपण करून साजरा करण्यात आला.
स्वाती खाडे याप्रसंगी म्हणाल्या, मरावे परी किर्तिरूपी उरवे या क्लुप्तीप्रमाणे स्कूलचे संचालक दत्ता (अण्णा) खाडे यांनी जीवन व्यतीत केले. गरजू लोकांच्या उपयोगी पडणे हा अण्णांचा छंद होता. समाजकार्याची त्यांना खूप अवड होती. या समाजकार्यातूनच मिरजेतील खाडे शैक्षणिक संकुलाची स्थापना करण्यात आली आहे. या शैक्षणिक संकुलामध्ये दीन, दलीत, गरीब व गरजू मुलांसाठी अद्यावत शिक्षण देणे हे त्यांचे स्वप्न होते. सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री तथा कामगार मंत्री महाराष्ट्र राज्य डॉ. सुरेश भाऊ खाडे व त्यांचे मोठे बंधू आबा खाडे यांचे ते पितृतुल्य बंधू होते.
त्या पुढे म्हणाल्या, या दोघांच्या प्रगती व जडणघडणीमध्ये अण्णांचा सिंहाचा वाटा आहे. अण्णांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या जाण्याने खाडे कुटुंबात पोकळी निर्माण झाली. त्यांच्या स्मृती कायमस्वरूपी टिकण्यासाठी, त्यांच्या वृक्षारोपणाचा छंद जोपासत त्यांच्या जयंतीनिमित्त वृक्षारोपणाचा उपक्रम राबवत आहे. त्याचाच एक भाग म्हणून कुकटोळी (ता.कवठेमहंकाळ) गावातील गिरलिंग या देवस्थानाभोवती वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेण्यात आला. साधारण २०० देशी झाडांचे रोपण करण्यात आले.
याप्रसंगी गिरलिंग संस्थानचे मठपती बाळ महाराज, संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी स्वाती सुशांत खाडे, शाळेच्या मुख्याध्यापिका संगीता पाटील व सुप्रिया पाटील, समन्वयक ज्योत्स्ना माने, निकोंसचे सदस्य प्रमोद जगताप, कुकटोळी गावाचे युवा कार्यकर्ते सुदाम पासाले, प्रकाश चव्हाण, सूरज बोराडे, गजानन पवार, प्रसाद पासले, प्रतीक निकम, संदीप पाटील, नामदेव कांबळे, शुभम वाघमारे, अमेय वाघमारे, संजय खांडेकर, संजय गडदे, उदय वाघमारे , सौरभ वाघमारे तसेच स्कूलचे शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.