मिरजेतील ज्युबिली इंग्रजी कन्या शाळेत पोक्सो कायदा मार्गदर्शन शिबीर उत्साहात

न्यायमूर्ती आर. एस. वानखेडे यांनी अधोरेखित केले बालकांचे संरक्षण (पोक्सो) कायद्याचे महत्त्व
मिरज (प्रतिनिधी)
महिला व मुलींवरील अत्याचाराच्या वाढत्या घटनांमुळे विद्यार्थिंनीमध्ये सुरक्षिततेची भावना आणि कायद्याविषयी जनजागृती निर्माण होण्यासाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सांगली यांच्या निर्देशानुसार तालुका विधी सेवा समिती मिरज व वकील बार संघटना मिरज यांचे संयुक्त विद्यमाने ज्युबिली इंग्रजी कन्या शाळा, मिरज येथे विद्यार्थिनींसाठी मार्गदर्शन शिबीर पार पडले.

तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्ष तथा कनिष्ठ स्तर मिरजचे दिवाणी न्यायाधीश आर. एस. वानखेडे यांनी विद्यार्थिंनीना समजेल अशा सहजसोप्या भाषेत लैंगिक गुन्ह्यांपासून बालकांचे संरक्षण (पोक्सो) कायदा समजावून सांगितला. त्यांनी उपस्थित विद्यार्थिनींना मार्गदर्शन करताना मुलींनी समाजात वावरताना विशेष काळजी घेण्यास सांगितले. तसेच पिडीतांनी न घाबरता तक्रार द्यावी व कायद्याचा वापर करावा असे आवाहनही केले.

शिबिरात प्रमुख वक्ते म्हणून विधिज्ञ ॲड.राजेंद्रकुमार सोनावळे यांनी सोप्या शब्दांत लैंगिक गुन्ह्यांपासून बालकांचे संरक्षण कायदा २०१२ (पोक्सो कायदा) या विषयावर मार्गदर्शन करताना या कायद्यातील शिक्षेचे स्वरूप, पिडीतांना संरक्षण, गोपनीयता, नुकसान भरपाई या आणि इतर विषयांवर उपस्थितांना मार्गदर्शन केले. विधिज्ञ ॲड. आशा दोशेट्टी यांनी हुंडा, स्त्री भृण हत्या आणि इतर सामाजिक दुष्कृत्ये याबाबत उपस्थितांना मार्गदर्शन केले. तर श्री फारूक नालबंद, पोलीस हेड कॉन्स्टेबल, वाहतूक पोलीस मिरज यांनी वाहतूकीचे नियम पाळण्याचे आवाहन करताना अज्ञान व्यक्तींनी विना लायसन्स गाडी चालविण्याचे कायदेशीर तोटे व त्यामुळे त्यांच्या पालकांना होणारा भुर्दंड याबाबत माहिती सांगितली.

यावेळी मिरज वकील बार संघटना मिरजचे अध्यक्ष ॲड.मोहन खोत, उपाध्यक्ष ॲड. प्रसाद खटावकर, सचिव ॲड.प्रविण पाटील, सहसचिव ॲड.विनयकुमार पाटील, सदस्य ॲड. रविंद्र लोणकर, ज्युबिली इंग्रजी कन्या शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती सोपल मॅडम, पर्यवेक्षक रास्ते सर, ए. के. देशपांडे, श्रीमती कविता चौथाई, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थिनी उपस्थित होते.

About The Author