केडीसीसी बँकेच्या संचालकपदी राजेश पाटील यांची निवड   

कोल्हापूर, (प्रतिनिधी):- कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालकपदी राजेश पांडुरंग पाटील यांची एकमताने निवड झाली. बँकेचे संचालक व आमदार कै. श्री. पी. एन. पाटीलसाहेब यांच्या निधनामुळे ही जागा रिक्त झाली होती. या जागेवर एकमेव श्री. पाटील यांचा अर्ज आल्यामुळे ही निवड बिनविरोध झाली. संचालक मंडळाच्यावतीने महाराष्ट्र राज्याचे वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री तथा; कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री व बँकेचे अध्यक्ष हसन मुश्रीफ यांनी त्यांचा सत्कार केला.      

पालकमंत्री श्री. मुश्रीफ म्हणाले,  दिवंगत आमदार पी. एन.  पाटीलसाहेब यांनी सलग ४० वर्षे बँकेचे संचालक म्हणून काम केले. बँकेच्या प्रत्येक बैठकीला जातीनिशी उपस्थित असायचे. त्यांनी सदैव बँकेच्या आणि शेतकरी हितालाच प्राधान्य दिले. सभागृहाच्या ईशान्य कोपऱ्यातील त्यांची खुर्ची ठरलेलीच असायची. गेल्या  तीन बैठका ही खुर्ची रिक्त होती. आज तीमध्ये त्यांचे सुपुत्र राजेश पाटील बसले.

कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या प्राथमिक कृषी पतपुरवठा, विकास सेवा सहकारी संस्था, संयुक्त शेती संस्था तसेच धान्य अधिकोष सहकारी संस्था तालुका करवीर या प्रवर्गातील रिक्त झालेल्या जागेवर संचालक म्हणून श्री.  पाटील यांची बिनविरोध निवड झाली.   सूचक म्हणून मंत्री श्री. मुश्रीफ आणि  आमदार सतेज उर्फ बंटी डी. पाटील यांनी अनुमोदन दिले. या जागेसाठी केवळ एकच अर्ज प्राप्त झाला. अध्यासी अधिकारी म्हणून सहकारी संस्था उपनिबंधक श्री. नीलकंठ करे यांनी काम पाहिले.            

         आमदार सतेज उर्फ बंटी डी पाटील म्हणाले, दिवंगत आमदार श्री. पी. एन. पाटीलसाहेब यांचा सहकार- समृद्धीचा आणि शेतकरी हिताचा वारसा त्यांचे सुपुत्र राजेश पाटील सक्षमपणे पुढे चालवतील.   राजेश पाटील म्हणाले, वडील दिवंगत आमदार कै. श्री. पी. एन. पाटीलसाहेब यांचा शेतकरी कल्याणचा  वारसा जिल्हा बँकेच्या माध्यमातून मी मनापासून पुढे चालवीन.       

        यावेळी  उपाध्यक्ष आमदार राजूबाबा आवळे, माजी खासदार प्रा. संजय मंडलिक, आमदार सतेज उर्फ बंटी पाटील, आमदार राजेश पाटील, माजी खासदार डॉ. श्रीमती निवेदिता माने,  ए. वाय. पाटील, प्रताप उर्फ भैय्या माने, बाबासाहेब पाटील -आसुर्लेकर, संतोष पाटील, रणजीतसिंह पाटील, सुधीर देसाई, रणवीरसिंग गायकवाड, विजयसिंह माने, सौ. श्रुतिका काटकर, सौ. स्मिता गवळी आदी संचालक उपस्थित होते.

About The Author