सर्व शिक्षकांना बीएलओ कामातून कार्यमुक्त करा – महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेची मागणी

सांगली (प्रतिनिधी)
नुकतेच शैक्षणिक व अशैक्षणिक कामाच्या वर्गीकरण बाबत दिनांक 23 ऑगस्ट 2024 रोजी शासन आदेश आला आहे.या शासन आदेशात शैक्षणिक व अशैक्षणिक कामाचे वर्गीकरण करण्यात आलेले आहे. शासन आदेशातील परिशिष्ट ब मधील मुद्दा क्रमांक दोन मध्ये प्रत्यक्ष निवडणूक कामाच्या व्यतिरिक्त निवडणूक विषयक नियमित चालणारी कामे अशैक्षणिक असण्याबाबत स्पष्ट उल्लेख आहे.

बी.एल.ओ.काम हे प्रत्यक्ष निवडणुकी शिवाय सातत्याने चालणारे काम आहे.अनेक शिक्षक बीएलओ असल्याकारणाने सातत्याने चालणाऱ्या या कामाचा शालेय कामकाजावर परिणाम होतो.याबाबत यापूर्वी अनेक वेळा सदर काम शिक्षकांना देण्यात येऊ नये याबाबत मागणी केली होती.पण निवडणुकीचे काम नाकारता येणार नाही म्हणून शिक्षकांना सक्तीने बीएलओ म्हणून काम देण्यात आले. शालेय शिक्षण विभागाच्या शासन आदेशानुसार हे काम शिक्षकांना बंधनकारक करण्यात येऊ नये असे स्पष्ट केले आहे.

याबाबतची कार्यवाही तातडीने करण्यात येवून सांगली जिल्ह्यामध्ये ज्या शिक्षकांना सदर काम दिलेला आहे त्यांना बी एल ओ कामातून कार्यमुक्त करण्यात यावे असे निवेदन यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती पाटील मॅडम यांच्याकडे जुनी पेन्शन संघटनेचे जिल्हाध्यक्ष अमोल शिंदे माध्यमिक विभागाचे जिल्हाध्यक्ष माननीय श्री. बापूसाहेब दाभाडे उपाध्यक्ष श्री.लाखन मकानदार, मनपा प्रमुख श्री.इम्रान मुजावर,मनपा क्षेत्र सचिव श्री.इंगोले सर यांनी दिले.निवेदन निवडणूक शाखेला देवून याबाबत योग्य ती कार्यवाही केली जाईल असे यावेळी निवासी उप जिल्हाधिकारी मॅडम यांनी सांगितले.

“प्रत्यक्ष निवडणुकीचे काम सर्व शिक्षक नेहमीच करतात.परंतु BLO सारखे सातत्यपूर्ण काम आमच्या मूळ कामावर परिणाम करणारे आहे.त्यामुळे शिक्षकांना यापुढे कामावर बहिष्कार टाकण्याची वेळ येऊ न देता या कामातून शिक्षकांना कार्यमुक्त करण्यात यावे”

About The Author