मिरज बस स्थानकातील खून प्रकरणी सराईत गुन्हेगारास अटक ; गांधी चौक पोलिसांकडून तपास

मिरज (प्रतिनिधी)
मिरज शहरातील ग्रामीण बसस्थानकावर बाकड्यावर बसण्याच्या कारणावरून एकाने कर्नाटकातील वृद्धाला भोसकले होते. याप्रकरणी तांत्रिक माहिती आणि सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या फुटेजद्वारे कसोशीने तपास करत एकाला अटक करण्यात मिरजेतील महात्मा गांधी चौक पोलिसांना यश आले. संभाजी चंद्र नाईक (वय ४०, रा. जानराववाडी, ता. मिरज) असे अटक केलेल्याचे नाव आहे. नारायण लक्ष्मण बडोदे (वय ५९, रा. हुब्बरहट्टी, ता. रायबाग, जि. बेळगाव) असे मृताचे नाव आहे.

अधिक माहिती अशी कि, दि.२ ऑगस्ट रोजी सायंकाळी पावणेसातच्या सुमारास एक व्यक्ती मिरज ग्रामीण बस स्टँडवर बेशुद्धावस्थेत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन १०८ रुग्णवाहिकेच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून त्याची तपासणी केली. त्यावेळी ती व्यक्ती मृत झाल्याचे स्पष्ट झाले. त्याचे नाव नारायण बडोदे असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी शासकीय रूग्णालयात हलवण्यात आला.

उत्तरीय तपासणीत मृतदेहाच्या पोटावर वार असल्याचे दिसून आले. त्यामुळे त्याचा खून झाल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर मिरजेचे पोलिस उपअधीक्षक प्रणिल गिल्डा यांनी यातील संशयिताला पकडण्याच्या सूचना महात्मा गांधी चौक पोलिसांना दिल्या. त्यानुसार पथकाने दि. २ आगस्ट रोजीचे तसेच अन्य दिवसांचे परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज अनेकदा तपासले. त्यात मृत बडोदे याच्याशी एकजण झटापट करत असल्याचे दिसून आले. त्यातील संशयिताची चौकशी केल्यानंतर तो बिगारी कामगार असून शहरात विविध ठिकाणी थांबत असल्याची माहिती मिळाली.

त्याचा शोध घेतल्यानंतर तो स्टँडच्या मागील अंधारात लपून बसल्याची माहिती मिळाली. पथकाने तेथे जाऊन त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे कसून चौकशी केल्यानंतर त्याने पाऊस आल्यानंतर स्टँडवरील बाकड्यावर बसण्यावरून वाद झाल्यानंतर बडोदे याचा चाकून भोसकून खून केल्याची कबुली दिली. त्यानंतर त्याला अटक करण्यात आली. बडोदे सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर मिरज शहर पोलिस ठाण्यात खुनाच्या प्रयत्नाचे दोन गुन्हे दाखल आहेत.

पोलीस अधीक्षक संदीप घुगे, अप्पर पोलीस अधीक्षक रितू खोखर, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणील गिल्डा यांच्या मार्गदर्शनाखाली महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुधीर भालेराव, सहाय्यक पोलीस निरीक्षक बिराप्पा लातूरे, पोलीस उपनिरीक्षक संदीप गुरव, विनोद शिंदे, उदय कुलकर्णी, सहाय्यक पोलीस फौजदार धनंजय चव्हाण, पोलीस हेडकॉन्स्टेबल अभिजीत धनगर, सुरज पाटील, सचिन कुंभार, पोलीस कॉन्स्टेबल जावेद शेख, विक्रम खोत, मोसिन टीनमेकर, विनोद चव्हाण, बसवराज कुंदगोळ यांनी ही कारवाई केली.

About The Author