केआयटीच्या श्रमसंस्कार शिबीरात ग्राम विकासाचा जागर

कोल्हापूर (प्रतिनिधी)

येथील केआयटी अभियांत्रिकी (स्वायत्त) महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजनेचे विशेष श्रमसंस्कार शिबीर बाचणी, ता. करवीर नुकतेच संपन्न झाले.

 या शिबिरात स्वयंसेवकांनी गावच्या स्मशान भूमीची स्वच्छता केली. प्रा. अतुल देसाई यांचे ‘बालसंगोपन: हक्क व सुरक्षा विषयक कायदे’ या विषयावर व्याख्यान झाले, डॉ. महेश्वर शितोळे यांचे ‘हृदयरोग व घ्यावयाची काळजी’ या विषयावर आरोग्यविषयक सल्ला दिला,  प्रा. विवेक देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली ‘टीम गगनवेधीची’ प्राथमिक व माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांसाठी अवकाश निरीक्षण प्रात्यक्षिके पार पडली.  तसेच स्वयंसेवकांनी शाळेच्या परिसराची व गावातील विविध ठिकांणांची स्वच्छता केली. प्रसिद्ध वक्ते चंद्रशेखर फडणीस यांचे ‘आनंदाचे गांव’ या विषयावर व्याख्यान दिले, विद्याप्रबोधिनीचे प्रा. राजकुमार पाटील यांचे ‘स्पर्धा परीक्षा स्वरूप आणि आवश्यक तयारी’  या विषयावर  व्याख्यान दिले, तसेच विविध खेळांचे व चित्रकला स्पर्धांचे आयोजन केले होते.केआयटी च्या रासेयो स्वयंसेवकांनी पथनाट्याच्या माध्यमातून गावामध्ये विविध विषयांचे सादरीकरण केले. 

        शिबिराच्या सांगता समारंभात बाचणी गावचे प्रतिष्ठित नागरिक सागर सावेकर हे  प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते, तसेच ग्रामविकास अधिकारी श्री. अमोल काजवे, विद्यमान सरपंच उदय साळवी, उपसरपंच बंडोपंत सुतार, तंटामुक्ती अध्यक्ष पांडुरंग चौगले, क्रीडाशिक्षक श्री. पाडेकर यांची प्रमुख उपस्थिती लाभली. शिबिरादरम्यान  उत्कृष्ट श्रमदान व उपक्रमांचे आयोजन केल्याबद्द्ल उपस्थितांच्या हस्ते सर्व स्वयंसेवक व कार्यक्रम अधिकारी यांचा ग्रामपंचायत बाचणीच्या वतीने प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले. सदर शिबीर यशस्वीरित्या पार पाडण्यात सर्व आजी माजी सरपंच, उपसरपंच, विविध पदाधिकारी व ग्रामपंचायत कर्मचारी  प्रकाश पाटील तसेच प्रा.अमित वैद्य यांचे सहकार्य लाभले.

         केआयटीचे संचालक डॉ. मोहन वनरोट्टी यांचे मार्गदर्शन व  चेअरमन सुनील कुलकर्णी, व्हा.चेअरमन साजिद हुदली व सेक्रेटरी दीपक चौगले यांचे प्रोत्साहन लाभले. शिबिराचे पूर्ण नियोजन रासेयो कार्यक्रम अधिकारी डॉ. निवास पाटील यांनी केले. रासेयो स्वयंसेवक माधव धामापूरकर, सुश्रुत शेळके, आकांक्षा घडशी व अन्य स्वयंसेवकांनी उत्तम रित्या पार पाडण्यासाठी विशेष परिश्रम घेतले.

About The Author