डायनामिक कराटे असोसिएशनचे विद्यार्थी ध्येयनिष्ठ व जिद्दी – विनायक यादव
मिरज (प्रतिनिधी)
डायनामिक कराटे असोसिएशनच्या विद्यार्थ्यांनी आजअखेर उत्तुंग यश संपादन केलेले आहे. हे विद्यार्थी ध्येयनिष्ठ असून जिद्द व चिकाटी ठेवून स्पर्धेस सामोरे जातात याचे नेहमीच कौतुक व अभिमान हि वाटतो. आगामी जिल्हास्तरीय तसेच राज्यस्तरीय स्पर्धांमध्ये सुद्धा हे चमकतील असा विश्वास उद्योजक विनायक यादव यांनी व्यक्त केला आहे. सांगलीतील डायनामिक कराटे असोसिएशनच्यावतीने महाराष्ट्र राज्याच्या कराटे चॅम्पियनशिप स्पर्धेसाठी राबवण्यात आलेल्या निवड चाचणी प्रसंगी ते बोलत होते.
ते पुढे म्हणाले, सध्याचे युग हे स्पर्धेचे युग आहे. कराटे सारखा क्रीडाप्रकार सांगलीतुन पुढे यावा, येथे चांगले खेळाडू तयार व्हावेत यासाठी डायनामिक कराटे असोसिएशनला नेहमीच मोलाचे सहकार्य केले आहे. जिल्हा, राज्य, राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर हे खेळाडू देशाचे नाव उज्ज्वल करोत हीच आमची इच्छा आहे. ऑलम्पिक स्पर्धेत निवड व्हावी यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करा तत्परतेने मदत करू अशी ग्वाही देत पुढील स्पर्धाना पात्र ठरणाऱ्या सर्वांना उद्योजक विनायक यादव यांनी सदिच्छा दिल्या. यावेळी डायनामिक कराटे असोसिएशनकडून उद्योजक विनायक यादव यांना मेडल देऊन सन्मानित केले. याप्रसंगी आयोजक सतीश पाटील, उदयसिंग घोरपडे, सर्व कराटे स्पर्धक व त्यांचे पालक उपस्थित होते.