मिरजेतील सिनर्जी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये विनाटाका हृदयाची झडप बदलण्याची शस्त्रक्रिया यशस्वी
डॉ. तुषार धोपाडे व सहकाऱ्यांनी नेत्रदीपक कामगिरी करीत मिरजेच्या वैद्यकीय क्षेत्रात रोवला मानाचा तुरा
मिरज (प्रतिनिधी)
येथील सुप्रसिद्ध सिनर्जी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल (दि.१५) सप्टेंबर रोजी प्रसिद्ध इंटरव्हेन्शनल कार्डिऑथोरासिक सर्जन डॉ. तुषार धोपाडे यांनी ट्रान्सकॅथेटर एओर्टिक वाल्व इम्प्लांटेशन (TAVI) म्हणजेच बिनटाक्याची हृदयाच्या झडप बदलण्याची शस्त्रक्रिया यशस्वीपणे केली. ही अत्याधुनिक प्रक्रिया एका ६६ वर्षीय रुग्णावर करण्यात आली, ज्याला गंभीर एओर्टिक वाल्व स्टेनोसिसची समस्या होती. ज्यामुळे हृदयातून शरीराच्या इतर भागात रक्तप्रवाह रोखला जात होता. सदरची शस्रक्रिया करीत डॉ. तुषार धोपाडे व त्यांच्या सहकाऱ्यांनी नेत्रदीपक कामगिरी करीत मिरजेच्या वैद्यकीय क्षेत्रात मानाचा तुरा रोवला आहे.
याप्रसंगी अधिक माहिती देताना डॉ. धोपाडे म्हणाले कि, या रुग्णाची २० वर्षांपूर्वी ओपन हार्ट सर्जेरी होऊन झडप बदलली होती. हि झडप खराब झालेली होती आणि ती तातडीने बदलण्याची आणि त्या करिता दुसऱ्यांदा ओपन हार्ट सर्जेरी करण्याची गरज होती आणि या प्रक्रियेत नवीन व्हॉल्व हा जुन्या व्हॉल्वमध्ये नेउन बसवण्याची आवश्यकता होती. शिवाय या रुग्णाची हृदयाची शरीरात रक्त पसरविण्याचे क्षमता फक्त २५% ते ३०% इतकीच होती. रुग्णाच्या किडनीची कार्यक्षमता सुद्धा कमी होणेबरोबरच रक्तातील पेशींचे कार्य हि व्यवस्थित नव्हते. मात्र अनुभवी वैद्यकीय पथकासोबत काम करीत पारंपारिक ओपन-हार्ट सर्जरीशिवाय ही प्रक्रिया यशस्वीपणे पार पाडली.
ते म्हणाले, तावी शस्त्रक्रिया पारंपारिक ओपन-हार्ट सर्जरीपेक्षा अधिक सुरक्षित आणि फायदेशीर आहे. आता तावी या नवीन तंत्रज्ञानामुळे अश्या रुग्णांवर इलाज करणे शक्य झाले आहे. या अत्याधुनिक पद्धतीने एका कॅथेटरद्वारे हृदयाची कृत्रिम झडप ही खराब असणाऱ्या हृदयाच्या झडपेवर बसविले जाते. यासाठी जांघेत एक छोटे छिद्र करून कॅथेटर दुर्बिणीद्वारे हृदयापर्यंत नेउन झडप बदलल्यानंतर कॅथेटर बाहेर काढला जातो. या प्रक्रियेमुळे ओपन-हार्ट सर्जरीची गरज नसते, ज्यामुळे रुग्णांच्या शरीरावर कमी ताण पडतो आणि वेदनाही कमी होतात. यामध्ये रक्तस्राव आणि संक्रमणाचा धोका खूपच कमी असतो. तसेच रुग्णालयात राहण्याचा कालावधीही कमी असतो. काहीच दिवसांत रुग्ण बरा होऊन दैनंदिन जीवनात परतू शकतो. या प्रक्रियेनंतर रुग्णाच्या हृदयाच्या कार्यक्षमतेत सुधारणा होते आणि जीवनाचा दर्जा वाढतो. विशेषत: वृद्ध आणि जास्त जोखीम असलेल्या रुग्णांसाठी तावी शस्त्रक्रिया सुरक्षित आणि फायदेशीर ठरते. डॉ. तुषार धोपाडे यांच्या नेतृत्वाखालील वैद्यकीय पथकाने ही शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पाडली. सिनर्जी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल येथे उपलब्ध असलेल्या अत्याधुनिक उपचार पद्धतींमुळे हि प्रक्रिया करणे शक्य झाले आणि या क्षेत्रातील उत्कृष्टता पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.