कोल्हापुरात यावेळी छत्रपतींच्या गादीचा करिष्मा

लोकसभा निवडणुकीची मजमोजणी सुरू असून देशात अनेक ठिकाणी धक्कादायक निकाल लागले आहेत. कोल्हापूमध्येही (Kolhapur) सत्ताधारी गटाचे खासदार संजय मंडलिक यांचा शाहू महाराज यांनी पराभव केला आहे. शिवसेना शिंदे गटासाठी ही प्रतिष्ठेची जागा होती. संजय मंडलिक हे विद्यमान खासदार होते. मात्र कोल्हापूरकरांनी यावेळी छत्रपतींच्या गादीवरचं प्रेम दाखवून दिलं आहे. तब्बल १ लाख मताधिक्यांनी शाहू महाराजांचा विजय झाला आहे.

पक्षफूटीच्या राजकारणानंतर एकनाथ शिंदे यांच्यासाठी कोल्हापूरची(Kolhapur) निवडणूक प्रतिष्ठेची बनली होती. कारण कोल्हापूरच्या दोन्ही जागा शिंदे गटाकडे होत्या. एकनाथ शिंदेंनी अनेक दिवस कोल्हापुरात ठाण मांडलं होतं. मात्र महाविकास आघाडीकडून शाहू महाराज यांचं संजय मंडलिकांसमोर मोठं आव्हान होतं. एक्झिट पोलमध्येही संजय मंडलिकांचा पराभव होणार असे अंदाज मांडण्यात आले होते. अखेर आज निकाल जाहीर झाला आणि शाहू महाराज १ लाख मताधिक्यांनी विजयी झाले आहेत. त्यांच्या या विजयात सतेज पाटील यांचा सिंहाचा वाटा असल्याचं मानलं जात आहे.

देशात 2014 मध्ये देशात नरेंद्र मोदींची लाट होती. तर भाजप आणि शिवसेनेची युती होती आणि या लोकसभा निवडणुकीत कोल्हापूरमध्ये राष्ट्रवादी विरुद्ध शिवसेनाअशी लढत झाली होती. राष्ट्रवादीचे उमेदवार धनंजय महाडिक शिवसेनेच्या संजय मांडलिकांविरोधात उभे होते. यावेळी केवळ 33, 542 मतांनी राष्ट्रवादीच्या महाडिकांनी शिवसेनेच्या मंडलिकांचा पराभव केला होता. मात्र 2019 च्या निवडणुकीत मंडलिकांनी त्याचा वचपा काढला. मंडलिकांनी तब्बल 2,70,568 मतांनी महाडिकांना अस्मान दाखवलं होतं.

मात्र यावेळी समीकरणं काही वेगळीचं होती. कारण शिवसेना असो की राष्ट्रवादी दोन्ही पक्षांमध्ये फूट पडली आहे. मात्र छत्रपतींची गादीने कोल्हापुरात कॉंग्रेसला तारलं आहे. शाहू महाराज सुरुवातीपासून आघाडीवर होते. मंडलिकांना एकाही फेरीत आघाडी घेता आली नव्हती. अखेर शाहू महाराज यांनी १ लाख मंतानी संजय मंडलिक यांचा पराभव केला आहे.

About The Author