एक गाव एक गणपती मोहीम राबविणाऱ्या गावाला श्री ची मूर्ती, 11 हजार व बागडेबाबा पुरस्कार देवून गौरविणार

जत व मंगळवेढा तालुक्यात मानव मित्र संघटनेचा उपक्रम; तुकाराम बाबा महाराज यांची माहिती

जत (प्रतिनिधी)
राष्ट्रीय संत गाडगेबाबा, वैराग्य संपन्न श्री संत सयाजी बागडेबाबा यांच्या विचाराचा सामाजिक वारसा जपणारे चिक्कलगी भुयार मठाचे मठाधिपती तथा श्री संत बागडेबाबा मानव मित्र संघटनेचे सर्वेसर्वा हभप तुकाराम बाबा महाराज यांनी यावर्षीपासून जत व मंगळवेढा तालुक्यात एक गाव एक गणपती मोहीम राबविणाऱ्या गावांना श्री ची मोफत मूर्ती, रोख 11 हजार व श्री संत सयाजी बागडेबाबा सन्मान पुरस्कार-2024 देवून गौरविण्यात येणार आहे.
एक गाव एक गणपती बरोबरच विशेष उपक्रम राबविणाऱ्या गावाला विशेष पुरस्कार देण्यात येणार असल्याचे तुकाराम बाबा यांनी आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले. यावेळी मानव मित्र संघटनेचे रामदास भोसले, जयदीप मोरे, पिंटू मोरे, विशाल राठोड उपस्थित होते.

जत, मंगळवेढा असो की सांगली, कोल्हापूर, रायगड जेव्हा जेव्हा दुष्काळ, महापूर, कोरोनासह नैसर्गिक आपत्ती आली तेव्हा तेव्हा मदत नव्हे तर कर्तव्य मानत श्री संत बागडेबाबा मानव मित्र संघटनेने निस्वार्थपणे मदतीचा हात दिला असल्याचे सांगून तुकाराम बाबा महाराज म्हणाले, गावात एकोपा, सलोखा वाढावा हाच उद्देश डोळ्यासमोर ठेवून श्री संत सयाजी बागडेबाबा यांच्या पुण्यतिथीनिमित्य २०१० पासून हभप तुकाराम बाबा यांनी एक गाव एक मोहीम राबविणाऱ्या गावासाठी श्री च्या मुर्त्या मोफत देण्याचा अभिनव उपक्रम हाती घेतला. मंगळवेढा नंतर २०१९ पासून जत तालुक्यात ‘एक गाव एक गणपती’ राबविणाऱ्या गावांना श्री ची मोफत मूर्ती भेट देण्याचा अभिनव उपक्रम सुरू केला. मागील १४ वर्षांपासून हा उपक्रम सुरू आहे.

मागील वर्षी पावसाने दडी दिल्याने जत तालुक्यात भयावह दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली होती. अनावश्यक खर्च टाळून गावांनी एक गाव एक गणपती बसवावा यासाठी आमचा हा उपक्रम असल्याचे सांगून तुकाराम बाबा महाराज म्हणाले यावर्षी या उपक्रमात बदल करण्यात आला आहे. एक गाव एक गणपती मोहीम राबविणाऱ्या गणेश मंडळाली श्री संत बागडेबाबा मानव मित्र संघटनेकडे येत्या ३० ऑगस्ट पर्यत नाव नोंदणी करायची आहे. ज्या गावाची नाव नोंदणी होईल त्याच गावाला श्री ची मूर्ती मोफत देण्यात येणार आहे. नाव नोंदणी झाल्यानंतर त्या गावाची पाहणी श्री संत बागडेबाबा मानव मित्र संघटनेच्या गणेश कमेटीकडून करण्यात येईल. ज्या गावांनी 100 टक्के हा उपक्रम राबविला आहे त्यांना रोख 11 हजार रुपये श्री संत सयाजी बागडेबाबा सन्मान पुरस्कार-2024 देण्यात येणार आहे. एक गाव एक गणपतीबरोबरच विशेष कार्यक्रम राबविण्या गावाला विशेष पुरस्कार देवून मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात येणार आहे.

५१ हजार टी शर्ट होणार वाटप
गणेशोत्सव निमित्त श्री संत बागडेबाबा मानव मित्र संघटनेच्या वतीने ५१ हजार टी शर्ट वाटप करण्यात येणार आहे. गणेश मंडळांना प्राधान्य देण्यात येणार आहे. सभासद फी 51 रुपये भरल्यानंतर टी शर्ट देण्यात येणार आहे. तेव्हा टी शर्टसाठी नोंदणी करावी असे आवाहन हभप तुकाराम बाबा महाराज यांनी केली आहे.

About The Author