बेळगाव तालुक्यासह नजीकच्या शहर परिसरात टस्कर हत्तीचा धुमाकूळ
बेळगाव (प्रतिनिधी) अन्नाच्या शोधात जंगलातून बेळगाव तालुक्याच्या ग्रामीण भागात प्रवेश केलेल्या एका रानटी हत्तीने बॉक्साईटरोडवरील आझमनगर व तालुक्याच्या कंग्राळी (बुद्रुक) गावासह विविध भागात धुमाकूळ घातल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. शुक्रवारी पहाटे जंगलातून ग्रामीण भागातील शेतवाडीत दाखल झालेला हा हत्ती पहाटेच्यावेळी मॉर्निंगवॉकला गेलेल्या नागरिकांच्या नजरेस पडला.
बेळगाव तालुक्याच्या ग्रामीण भागात हत्ती दाखल झाल्याची बातमी सर्वत्र वाऱ्यासारखी पसरली. यानंतर हत्तीला पाहण्यासाठी घटनास्थळी लोकांनी एकच गर्दी केली होती. काहीजणांनी हत्ती फिरत असताना मोबाईलमध्ये व्हिडीओ चित्रीकरण केले तर काहींनी दुरून सेल्सी टिपले. सुदैवाने घटनेत जीवित व वित्तहानी टळली.
दरम्यान बेळगाव तालुक्याच्या ग्रामीण भागात रानटी हत्ती दाखल झाल्याची माहिती मिळताच वनाधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत. हत्तीला जंगलात पिटाळण्यासाठी धडपड सुरू केली. सदर हत्ती रानटी असल्याने त्याला पकडणे अवघड असून, त्याला भूल देऊन एका मोठ्या ट्रकमधून जंगलात आणणे योग्य असल्याची चर्चा आहे.
बसव कॉलनी परिसरात वाहनांची तोडफोड
बेळगाव तालुक्याच्या ग्रामीण भागात संचार केल्यानंतर काहीवेळात सदर हत्तीने आपला मोर्चा बॉक्साईटरोडवरील आझम नगर, बसव कॉलनीकडे वळविला. येथे मानवी वस्तीत मुक्तसंचार करताना काही वाहनांची तोडफोड केली. यावेळी हत्तीला पाहून येथील नागरिक भयभीत झाले. सुमारे तीन तास कंग्राळी (बुद्रुक) त्यानंतर आझमनगर, बसव कॉलनी परिसरात फिरल्यानंतर हत्ती पुन्हा उचगावच्या दिशेने मार्गस्थ झाला.
वन्यप्राणी मानवीवस्तीत दाखल होण्याच्या घटनांमध्ये वाढ
गेल्या दोन-तीन दशकांत पैशाच्या हव्यासापाई मानवाने वन्य जमीन अव्याहतपणे संपुष्टात आणली आहे. परिणामी वन्य प्राणी मानवीवस्तीत दाखल होण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. गत दोन वर्षांपूर्वी बेळगाव जाधवनगरमध्ये एका बांधकाम कामगाराला जखमी करून बिबट्याने रेसकोर्स मैदानात घुसून सुमारे १ महिना पोलिस आणि वनविभागाच्या अधिकाऱ्यांची झोप उडवली होती. त्यानंतर आता या रानटी हत्तीने वनविभागाची डोकेदुखी वाढविली आहे.