पट्टणकुडीत पाण्याच्या टाकीत पडून बालकाचा दुर्दैवी मृत्यू

निपाणी (प्रतिनिधी) पट्टणकुडी (ता. चिकोडी) येथे दारात खेळता खेळता घराशेजारी असणाऱ्या पाण्याच्या टाकीत पडून चार वर्षाच्या मुलाचा दुर्देवी मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी (दि. ७) सायंकाळी सहा वाजण्याच्या दरम्यान घडली. सक्षम भरतेश उपाध्ये असे मयत झालेल्या बालकाचे नाव आहे. घटनेची नोंद खडकलाट पोलिसात झाली आहे.

पोलिसांच्या कडून मिळालेली अधिक माहिती अशी की, उपाध्ये कुटुंब यांचे पट्टणकुडी जैन बस्ती परिसरात घर आहे. त्यांच्या जुन्या घराला लागून त्यांनी नव्या घराचे बांधकाम सुरू केले आहे. काल गुरुवारी घराजवळ असलेल्या पाण्याच्या टाकीत खेळता खेळता मयत सक्षम हा पडला. दरम्यान बराच उशीर सक्षम कुटुंबीयांच्या नजरेस न आल्याने त्याचा इतरत्र शोध घेतला. मात्र तो मिळून न आल्याने तो पाण्याच्या टाकीत पडल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. यावेळी त्यांच्या कुटुंबियांनी एकच आक्रोश केला.

दरम्यान त्याला तातडीने उपचारासाठी गावातील रुग्णालयात हलवले. मात्र त्याची प्रकृती चिंताजनक बनल्याने प्राथमिक उपचारानंतर पुढील त्याला निपाणी येथील खाजगी रुग्णालयात दाखल केले असता उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला. घटनास्थळी खडकलाट पोलीस ठाण्याच्या उपनिरीक्षिका अनिता राठोड यांनी भेट देऊन पाहणी केली. मयत सक्षम यांच्या पाठीमागे आई, वडील लहान बहिण असा परिवार आहे. सक्षमच्या अकाली मृत्यूमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

About The Author