अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने भरपाई द्या

मिरज (प्रतिनिधी) अवेळी आलेल्या वादळी पावसामुळे मिरज तालुक्याच्या पूर्व भागासह जिल्ह्यातील विविध शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. द्राक्ष बागांसह नगदी पिके व केळी बागा उध्वस्त झाले आहेत. शासनाने पंचनामा प्रक्रियेत कोणतीही दिरंगाई न करता तातडीने नुकसानीचा पंचनामा करून शासनाकडे प्रस्ताव पाठवावा. व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सरसकट दुप्पटदाराने नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे युवक प्रदेश उपाध्यक्ष इंद्रजीत दादा घाटे यांनी केली आहे. त्यांनी मिरज तालुक्यातील सलगरे येथे पावसामुळे उध्वस्त झालेल्या शेती पिकाची पाणी करून शेतकऱ्यांना धीर दिला. शासनाकडून शेतकऱ्यांना तातडीने मधून मिळवून देण्यासाठी वरिष्ठ स्तरावर पाठपुरावा करू अशी ग्वाही त्यांनी दिली. शेतकऱ्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष करून तुटपुंजी मदत दिल्यास शासनाच्या विरोधात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही त्यांनी दिला.

     गेल्या चार-पाच दिवसांपासून अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. मिरज तालुक्याच्या पूर्व भागात सलगरे बेळंकी, चाबुकसरवाडीसह मालगाव आरग बेडग लिंगनूर खंडेराजुरी या परिसरात शेती पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. सलगरे येथे सोमनाथ अनंतपुरे या शेतकऱ्याची केळीबाग उध्वस्त झाल्याने संबंधी शेतकरी रस्त्यावर आला आहे. पावसामुळे झालेल्या शेतीचे नुकसान प्रचंड असून शासनाने मदत देण्याची गरज आहे. कोरोना कालावधीनंतर मोडकळी झालेला शेती व्यवसाय काही दिवसांपासून सावरत होता. मात्र आवळी व अवकाळी पावसामुळे पुन्हा शेतीला फटका बसला असून शेतकरी उध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे. अशा नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनाकडून मदत मिळवून देण्यासाठी वंचित बहुजन आघाडीकडून प्रयत्न करण्यात येत आहेत.

   पावसामुळे नुकसान झालेल्या शेती पिकांचे पाहणी करण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे युवक प्रदेश उपाध्यक्ष इंद्रजीत दादा घाटे यांनी कार्यकर्त्यांसमवेत मिरज तालुक्याच्या पूर्व भागाचा दौरा केला. यावेळी त्यांनी विविध शेतकऱ्यांच्या शेतांना भेटी देऊन नुकसान झालेल्या पिकांची माहिती घेतली. यावेळी त्यांनी तहसीलदार अपर्णा मोरे धुमाळ यांना दूरध्वनी करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पंचनामा बाबत आढावा घेतला. यावेळी त्यांनी संबंधित नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दुप्पट दराने नुकसान भरपाई देण्यासाठी शासनाकडे प्रस्ताव पाठवण्याची विनंती केली. तसेच स्थानिक प्रशासनाने प्रस्ताव पाठवल्यानंतर वरिष्ठ स्तरावर पाठपुरावा करून शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू, अशी ग्वाही दिली.

अवकाळी पावसामुळे नुकसानग्रस्त झालेल्या शेतकऱ्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष केल्यास तसेच त्यांना तुटपुंजी मदत देण्याचा प्रयत्न झाल्यास वंचित स्टाईलने रस्त्यावर उतरून आंदोलन केले जाईल, असा इशाराही इंद्रजीत दादा घाटे यांनी दिला. यावेळी वंचित बहुजनचे महासचिव राजु मुलाणी, युवक अध्यक्ष सुमेत भाई, नविनकुमार कांबळे, संदेश दरबारे, सागर कांबळे, मोहन कांबळे, अभिषेक कांबळे, गजानन कांबळे, महिंद्रा कांबळे, सुमेध माने उपस्थित होते.

About The Author